
नालासोपारा शिवसेनेच्या वतीने ३८ वजनकाट्यांचे वाटप

प्रतिनिधी
विरार- लहान मुलांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षण या अंगणवाडीच्या सामुदायिक कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना अनेक कामे करावी लागत असतात. ही कामे करताना व अंगणवाडीतील मुलांची काळजी घेताना त्यांना अनेक अडचणी येत असतात. विशेषकरून अंगणवाडी आणि परिसरातील मुलांच्या पोषणसंबंधी माहिती घेताना साहित्याचा अभाव असतो. अंगणवाडी सेविकांना भेडसावणारी हीच समस्या लक्षात घेऊन नालासोपारा शिवसेनेच्या वतीने परिसरातील सात अंगणवाडींतील ३८ सेविकांना ‘वजनकाट्या`चे वाटप करण्यात आले. शिवसेनेच्या या बहुमूल्य मदतीमुळे अंगणवाडी सेविकांच्या चेहऱ्यावर कृतज्ञता हास्य फुलले आहे.
नालासोपारा व परिसरातील सुदृढ आणि कुपोषित बालकांची माहिती संकलित करण्याच्या उद्देशातून अंगणवाडी सेविकांनी ‘वजनकाट््यां`ची मागणी शिवसेना युवा पंकज देशमुख यांच्याकडे केली होती.
अंगडवाडी सेविकांच्या या मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या ९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधण्यात आले. त्यानुसार शनिवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी नालासोपारा तुळींज शिवसेना शाखेत ‘वजनकाटा` वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीषदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेना युवा पंकज देशमुख, पालघर जिल्हा युवा सेनाधिकारी रोहन चव्हाण आणि महिला आघाडीच्या रेश्मा सावंत व भारती गावडे उपस्थित होत्या. या वाटप कार्यक्रमाचा दुसरा टप्पा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या (९ फेब्रुवारी) वाढदिवसादिवशी पार पडणार आहे.





