प्रतिनिधी : वसई भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झालेला असून पैसे मोजल्याशिवाय काम होत नाही. बहुतांश कामे दलालांच्या माध्यमातूनच होतात. सर्वसामान्य चुकून काम करण्यासाठी गेला तर असंख्य चकरा मारून ही काम होणार नाही. सदर प्रकरणी उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय वसई यांनी लक्ष घालून दलालांचा सुळसुळाट बंद करावा. जनतेची कामे बिना दलाल जलदगतीने व्हावीत, अशी मागणी करीत प्रजा सुराज्य पक्षाने भूमी अभिलेख कार्यालयाला निवेदन दिले आहे.वसई भूमी अभिलेख कार्यालय हा दलालांचा अड्डा बनलेला असून दलालांशिवाय या कार्यालयात एक ही काम होत नाही. जनता त्रस्त आहे. या दलालांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे खिसे गरम होतात. अधिकाऱ्यांना ही दलाल हवेच असतात. दलालांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना लाच घेणे सोईस्कर आणि सुरक्षित असते. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये दलाल बेधडकपणे वावरताना दिसतात.
सदर प्रकरणी कारवाई करण्या संदर्भात प्रजा सुराज्य पक्षाचे अध्यक्ष शरद तिगोटे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत रमेश धोंडे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत उप अधीक्षक रणजित देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
प्रजा सुराज्य पक्षाच्या सदर निवेदनाबाबत काही कारवाई होईल की भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट कायम राहील? सहजासहजी दलालांवर कारवाई होणार नाही, कठोर कारवाई करण्याकरिता प्रजा सुराज्य पक्षाला मोठी ताकत लावावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *