
पूर्वी दुग्ध व्यवसाय व आता सिडकोकडे असलेल्या शेकडो एकर जमिनीवर असलेले गवत अचानक गायब झाले आहे. सिडकोचे अधिकारी व खाजगी गवत व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा चारा घोटाळा केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा अपहार झाल्याची बाब पुढे आली आहे.
पालघर जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय विभागाची जमीन सिडकोने जिल्हा मुख्यालयाच्या बदल्यात ताब्यात घेतली होती. यातील चारशे एकर जमीन रेल्वे लागत केळवे रोड, टोकराळे, रामबाग, डोंगरपाडा या भागात आहे. या चारशे एकर जमिनीवर चांगल्या प्रतीचे गवत उगवते. या गवताचा लिलाव करून तो दरवर्षी निविदा प्रक्रियेने विकला जातो. मात्र आता निविदा प्रसिद्ध न होता हे गवत अचानक कापून नेल्याने कापणी करून गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. पावसाळ्यात किंवा सप्टेंबर पूर्वी निविदा प्रक्रिया राबवणे आवश्यक असताना कापणी हंगाम संपल्यानंतर त्या प्रसिद्ध केल्या जातात. तोपर्यंत गवत कापून खाजगी व्यापाऱ्यांमार्फत या गवताची परस्पर विक्री केली जाते. सुमारे 25 लाख रुपयांच्या गवत विक्री निविदा काढणे आवश्यक असताना सात ते आठ लाख रुपयात निविदा काढली जाते. त्यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत आहे. खाजगी व्यापाराच्या फायद्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे आरोप होत आहेत.
2018-19 मध्ये सात लाख 20 हजार 2019-20 मध्ये सात लाख 85 हजार रुपयांच्या निविदा गवत खरेदीसाठी प्रसिद्ध झाल्या होत्या. यंदा प्रसिद्ध झालेल्या निविदेला कोणीही प्रतिसाद दिला नसला तरी या निविदा अंतिम होण्याआधीच गवत कापून त्याची विक्री केली आहे.याबाबत सिडकोला माहीत नसल्याचे दिसते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सिडकोच्या इंजिनियर मार्फत दोन चार दिवसांपूर्वी सफाळे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
आता सिडकोची मालकी असलेल्या या चारशे एकर जमिनीवर शेकडो मजूर गवत कापणी करत होते. सलग पंधरा दिवस ही कापणी सुरू होती. या कापणीनंतर गवत रचून ते इतर ठिकाणी हलवले जात असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार दिसला नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे या गवत गैरप्रकारात सिडकोच्या अधिकाऱ्यांचाही हात असावा अशी शक्यता आहे. याचबरोबरीने पालघर मधील एक मोठा गवत व्यापारी यामध्ये सामील असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणांमध्ये सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे यांच्याशी फोनवरून व मेसेजवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
● सिडकोच्या गवत कापणी प्रकरणात एका अधिकाऱ्याने तक्रार अर्ज दाखल केला आहे त्या अनुषंगाने विविध बाबींचा तपास करून पुढील कार्यवाही केली जाईल असे सफाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी म्हटले आहे.


◆ या गवतामध्ये बेर जातीचे गवत होते. या उच्च प्रतीच्या गवत जातीच्या बाजारात चांगला दर मिळतो. हे गवत तबेले, दुधाळ जनावरांच्या चाऱ्यासाठी, कागद बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकला जातो. मात्र शासनाकडून हे गवत कमी पैशाने खरेदी करून त्यापेक्षा जास्त दराने विकून व्यापारी मोठे होत आहेत.