
नालासोपारा :- वीजबिलांबाबत असलेल्या बहुतांश तक्रारी विजेच्या मीटरचे योग्य पद्धतीने रिडिंग न घेतल्याने निर्माण होतात. या प्रकारावर आता तोडगा काढण्यात आला. त्यामुळे आता चुकीचे किंवा सरासरी मीटर रिडिंग घेण्याच्या पद्धतीला चाप बसणार आहे. मीटरचे रीडिंग घेण्यासाठी आता महावितरणकडून मोबाइल अॅपचा वापर करण्यात येणार असून प्रत्यक्ष मीटपर्यंत जाऊन फोटोसह रीडिंग घेतल्याशिवाय ते यंत्रणेत स्वीकारलेच जाणार नाही. या पद्धतीमुळे ग्राहकाला योग्य ते वीजबिल दिले जाणार असून, या माध्यमातून वीजबिलांबाबतच्या तक्रारीही कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच चुकीचे रीडिंग घेतल्यास रीडिंग एजन्सीवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
ग्राहकांनी वापरलेल्या युनिटप्रमाणेच वीजबिलाची आकारणी करण्याची जबाबदारी महावितरणची आहे. त्यासाठी फोटो मीटर रीडिंगसाठी स्वतंत्र मोबाईल अप तयार करण्यात आले आहे व रीडिंग घेण्याची प्रक्रिया सोपी व वेगवान केलेली आहे. प्रत्येक मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना चांगला मोबदला दिला जातो. तरीही मीटरचे चुकीचे रिडींग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे आदी प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे
वीजपुरवठ्याच्या बरोबरीने वीजबिलांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात. महावितरण कंपनीकडून मीटरचे रिडिंग घेण्याचे काम खासगी कंत्राटदारांना देण्यात आले आहे. सध्या प्रत्यक्ष मीटपर्यंत जाऊन त्याचा फोटो घ्यावा लागतो. हा फोटो वीजबिलावर छापण्यात येतो. बिलावर वीजवापराचा कालावधीही नमूद केलेला असतो. त्यामुळे फोटो पाहून ग्राहक वीजबिलाची पडताळणी करू शकतो. मात्र, या पद्धतीतही अनेक गडबडी होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा प्रत्यक्ष मीटपर्यंत न जाताच अंदाजे, सरासरी मीटर रीडिंग टाकले जाते. काही वेळेला मीटरचा फोटोही चुकीचा येतो. या सर्वाना आळा घालण्यासाठी यापुढे अॅपच्या माध्यमातूनच मीटर रीडिंग घेण्यात येणार आहे.
वसई मंडळातील वीजग्राहक…….
1) घरगुती – 7 लाख 72 हजार 257
2) औद्योगिक – 26 हजार 241
3) व्यावसायिक – 82 हजार 701
4) कृषी – 5 हजार 266
दररोज येतात कमी तक्रारी……….
मीटर रिडींगबाबत कोरोनाच्या काळात तक्रारी येत होत्या. पण आता रिंडिंग बाबत तक्रारी येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले आहे.
तक्रारींचे पुढे काय होते?……….
ग्राहकांनी मीटर रिडींगबाबत तक्रार केल्यावर त्याचे मीटर तपासणीसाठी पाठविण्यात येते. तिथे चेकिंग केल्यावर काही त्रुटी आढळल्यास वीज बिल कमी करून ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येते.
◆ 1) कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग 100 टक्के अचूक झालेच पाहिजे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व महावितरणच्या महसुलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रिडींग घेण्यात हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीज विरुद्ध महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाईसोबतच संबंधित कर्मचाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. – विजय सिंघल (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण)