
प्रतिनिधी:- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वसई पोलीस स्टेशन हद्दीतील भुईगाव पोलीस चौकीचे उप निरीक्षक बी. जे. केसरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी भगवान पालवे यांनी पदभार स्वीकारला आहे. बी. जे. केसरे अवैध धंदेवाल्यांकडून अवैध वसुली करीत असल्याबद्दल युवा शक्ती एक्सप्रेसने वृत्त प्रसिद्ध केले होते.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वसई पोलीस स्टेशन हद्दीतील भुईगाव पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात. अर्थातच पोलिसांच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे चालतात. भुईगाव पोलीस चौकीच्या हद्दीत येणाऱ्या रानगावमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारूच्या भट्ट्या चालतात. त्याच प्रमाणे अवैध रेती उत्खनन करून चोरीच्या रेतीचे ट्रक पोलीस संरक्षणात भुईगाव चौकीजवळून निघतात. या सर्व अवैध धंद्यांचा हप्ता बी. जे. केसरे वसूल करीत असल्याचे वृत्त युवा शक्ती एक्सप्रेसने सातत्याने प्रसिद्ध करून बी. जे. केसरे यांच्या सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला गेला होता. युवा शक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांनी याबाबत तक्रार करून सातत्याने पाठपुरावा केला होता. पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन बी. जे केसरे यांची बदली केली आहे. परंतु बदली ही कारवाई होत नाही. त्यांनी अवैध धंदेवाल्यांकडून प्रचंड वसुली केली आहे. तसेच अवैध धंदेवाल्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. अवैध धंदेवाल्यांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी द्यावेत.
वसई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आशीर्वादाने तमाम अवैध धंदे चालत आहेत, याची नोंद आयुक्तांनी घेऊन कारवाई करावी.
उप निरीक्षक बी. जे. केसरे यांची वसई पोलीस स्टेशनमधून बदली झालेली असताना ही ते भुईगाव पोलीस चौकी सोडत नव्हते. कारण त्यांना या ठिकाणी चांगला आर्थिक लाभ होत होता. बदलीच्या आदेशानंतर ही त्यांनी भुईगाव पोलीस चौकीचा पदभार सोडला नाही. म्हणजे बदलीचे आदेश त्यांनी धुडकावले. त्या बद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी.
दरम्यान, वसई पोलीस स्टेशन हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाईबाबत सातत्याने आवाज उठवून वरिष्ठांकडे तक्रारी दाखल केल्यावर बी.जी. केसरे यांच्या बदली नंतर भुईगाव चौकी मध्ये भगवान पालवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.