

विरार : (प्रतिनिधी) : विरारमधील उर्द्ु शाळेला भेडसावत असलेल्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांना विरार येथील उर्दु शाळेकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी या उर्दु शाळेला भेट देऊन शाळेच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच यापुढे शाळेला भेडसावणार्या समस्या दूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तहसिलदार सोनावणे, बीडीओ एन,जगताप, गटशिक्षणाधिकारी दवणे आदी मंडळी उपस्थित होती.
यावेळी विरार नगरपालिकेचे माजी नगरसेवक अब्दूल रेहमान बलोच यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. उर्दु शाळा 1 ली ते 10 वी पर्यंत येथे विद्यार्थ्यांनी शिकवण्यासाठी फक्त तीन शिक्षक आहेत. शाळेचा भुतकाळ पाहता या शाळेतून आत्तापर्यंत दोन मुली डॉक्टर तर एका मुलाने पि.एचडी केली आहे. कित्येक मुले पदवीधर झाले तर काही शिक्षक झाले. दारिद्य्ररेषेखाली नाव असलेली मुलेदेखील शाळेत शिकायला येतात. तर शासनाने शिक्षक दिले नाहीतर ही शाळा चालु ठेवण्याचा अर्थ काय? असा सवाल बलोच यांनी यावेळी केला. त्यामुळे शासनाने तात्काळ याठिकाणी लक्ष घालून शाळेला भेडसावत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.