
◆ महापालिका उपयुक्त कुरळेकर यांचा प्र.सहा.आयुक्तांना लेखी आदेश
विरार (प्रतिनिधी)- शासनाचे व वसई विरार महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध विकासक सुरेश चुंनीलाल जैन आणि नरेश चुंनीलाल जैन या दोन भावंडांनी खुलेआम विरार (पूर्व) येथील गाव मौजे पेल्हार सर्वे नं. ३२५/बी हिस्सा नं. ३ व ४ येथे दिवसाढवळ्या अवैधरित्या आरसीसीचे ८०० चौ. फुटाचे बांधकाम केले आहे. ही बाब मोहसीन शेख यांनी लेखी तक्रारीद्वारे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. याची गंभीर दाखल घेत अशा प्रकारे अतिक्रमण व अनधिकृत पणे बांधकाम सुरू असणे ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब असून आपण आणि आपले अधिनस्त कार्यरत संबंधित कर्मचारी हे सदर अनधिकृत बांधकामाबाबत हेतू पुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत असा शेरा पालिकेचे परि-२चे उपआयुक्त दीपक कुरळेकर यांनी दिलेल्या आदेशात मारला आहे. ते आदेशात पुढे म्हणतात, आपल्या प्रभागाअंतर्गत होणाऱ्या अनधिकृत बांधकाम निष्कसनाची नियमोचित कार्यवाही व कारवाई करण्याची सर्वस्वी जबाबदारी प्र.सहा.आयुक्त तथा पदानिर्देशित अधिकारी म्हणून आपलीच आहे. तरी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नियमोचित कार्यवाही आणि कारवाई करावी असे प्रभाग समिती सी च्या सहा.आयुक्तांना दिलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे.
हे बांधकाम ८०० चौ. फुटाचे नसून चक्क आठ हजार चौ. फुटाचे असल्याचे मोहसीन शेख यांनी सांगितले. हे अवैध बांधकाम पाहता पालिकेचे नगररचना विभाग आणि प्रभाग समिती सी चे काही भ्रष्ट अधिकारी यांनी अवैध विकासक सुरेश चुंनीलाल जैन व नरेश चुंनीलाल जैन यांच्यासोबत संगनमत करून त्यांच्यात मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याची शक्यता वर्तविली होती. हे अवैध बांधकाम तातडीने थांबून त्यावर तोडक कारवाई करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे विरार शहरप्रमुख मोहसीन शेख यांनी मागील आठवड्यात पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. पालिकेच्या उपयुक्त यांनी मोहसीन शेख यांच्या पत्राची गंभीर दखल घेऊन वरील आदेश दिल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांसह बांधकाम विकासकांना भीतीचे वातावरण पसरले आहे.