प्रतिनिधी :
गाव मौजे जुन्नर पाडा ता. डहाणू येथील आदिवासी खातेदार धनीबाई रघ्या गहला व इतर खातेदार यांची मालकी जागा रेल्वे प्रकल्पाखाली गेली असून त्यांना जागेचा मोबदला देण्यात आलेला नाही. मात्र त्यांच्या जागेवर रेल्वेकडून भरणी चालू असून सदर खातेदारांनी या बाबत तक्रार दाखल केली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, गाव मौजे जुन्नर पाडा ता. डहाणू येथील आदिवासी खातेदार धनीबाई रघ्या गहला व इतर खातेदार यांची मालकी जागा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरीडोर रेल्वे प्रकल्पाखाली गेली असून सदर भूखंडाची संयुक्त मोजणी (मो. र. नं. ७४/२००९) झाली आहे. खातेदार धनीबाई रघ्या गहला व इतर यांचे मालकी सर्वे नंबर २९/२/४/१ मधील क्षेत्र ०.१२.६० हे आर डीएफसीसी प्रकल्पाअंतर्गत भूसंपादनात येत असल्याचे दिसत आहे. सदर खातेदार मयत असून पहिल्या टप्प्यातील तसेच दुसऱ्या टप्प्यातील प्रस्ताव पाहता सदर सर्वे नंबर २९/२/४/१ मधील क्षेत्राबाबत संपादनाच्या प्रक्रियेची माहिती व मोबदला सदर खातेदारांच्या वारसांना देण्यात आलेला नाही.
खातेदारांना कोणताही मोबदला ना देता त्यांच्या सदर भूखंडावरील काजू, चिकू, आंबे व इतर झाडे कापून टाकण्यात आली आहेत. आणि सदर भूखंडावर रेल्वेकडून भरणी चालू आहे. सदर बाबत आदिवासी विभाग व संबंधित अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता तुमची जमीन अजून रेल्वे सुधारणा अधिनियम २००८ चे कलम २० ए मध्ये समावेश न झाल्याने संपादनाची प्रक्रीया पूर्ण झालेली नाही, असे सांगितले जाते.
सदर प्रकरणी अर्जदार लाळ्या गोविंद गहला, रडू विष्णू गोरखना, गोविंद शंकर डोंगरकर, भिवा शंकर डोंगरकर, जयश्री संतोष काठ्या, देवली बळवंत मासमार, संगीता चंद्र गोंड, विनोद लाखा गहला, रमली लक्ष्मण गहला, संतोष लक्ष्मण गहला, अर्जुन लक्ष्मण गहला, रेखा लक्ष्मण मोरे, नीलम निलेश कोती, सीता अविनाश गहला, लखमा अविनाश गहला, शकुंतला अशोक दळवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर व उप जिल्हाधिकारी (भूसंपादन ) सूर्या प्रकल्प डहाणू यांचे कार्यालय यांना निवेदन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *