
● विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या वसईतील आठ गुणिजणांचा गुणगौरव
वसई, दि.21(वार्ताहर )
कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखेतर्फे आयोजित कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात ‘कुसुमाग्रज’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यंदाचा ‘जागतिक मराठी राजभाषा दिन’ सोहळा रविवार, दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी माणिकपूर, वसई रोड (प.) येथील समाज उन्नती मंडळ सभागृहात सायं. 4.30 वा. आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील अग्रगण्य शेड्युल्ड बँकात गणली जाणाऱ्या बॅसीन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बँकेने हा कार्यक्रम पुरस्कृत केला असून, या समारंभात “लेखक कलावंत आपल्या भेटीला” या उपक्रमातून ख्यातनाम लेखक-कलावंत उपस्थितीतांशी संवाद साधणार आहेत. तसेच यावेळी राज्य पुरस्कार विजेत्या अतिथी लेखकांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, त्याच बरोबर विविध क्षेत्रात उलेखनिय कामगिरी बजावणार्या आठ वसईकरांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार
असल्याची माहिती कोमसाप, वसई शाखेच्या कार्यक्रम समितीचे प्रमुख विजय पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा यंदाचा सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तकाचा ‘श्रीपाद श्रीकृष्ण कोल्हटकर पुरस्कार’ विजेते लेखक सॅबी परेरा उपस्थित राहणार असून, त्यांच्या ‘टपालकी’ या पुस्तकास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच ललित गद्य प्रकारातील यंदाचा महाराष्ट्र शासनाचा ‘ताराबाई शिंदे पुरस्कार’ विजेते डॅनियल मस्करणीस यांच्या ‘मंच’ या पुस्तकास पुरस्कार प्राप्त झाला असून,
मस्करणीस यावेळी उपस्थित राहून संवाद साधतील. वसईच्या आदिवासी समाजातून पूढे आलेले अभिनेते राजेश उके यांनी नाट्य आणि दूरदर्शन मालिकांमधून कसदार अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त केले असून, त्यांच्या कलेचा अविष्कारही यावेळी अनुभवता येणार आहे.
वसईतील ख्यातनाम लेखक रेमंड मच्याडो यांच्या ‘जाना कुमारी’ या कादंबरीस अहमदनगरच्या प्रकाशकिरण प्रतिष्ठानचा यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असून, त्यांच्या ‘कोपात’ या कादंबरीचा मुंबई विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात समावेश आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे यांच्या ‘लीलाई’ दिवाळी अंकास अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असून ते वसई-विरार महानगर पत्रकार संघ, तसेच कोमसाप, वसई शाखेचे अध्यक्ष आहेत. मच्याडो आणि ज्येष्ठ पत्रकार रोकडे यांचाही कार्यक्रमात सहभाग राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात “मराठी पाऊल पडते पुढे” या भागात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या वसईतील आठ गुणिजणांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात येणार आहे. त्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिरीषकर ( शिरीषकर चॅरिटेबल ट्रस्ट), रोहन घोन्सालवीस (कार्डीनल ग्रेशस हॉस्पिटल),सौ. किरण बढे (समृद्धी महिला बचतगट), मिलिंद पोंक्षे (जाणीव ट्रस्ट), यती राऊत (मासिक पाळी जनजागृती), किर्ती शेंडे (ध्यास फाऊंडेशन), सुरेखा भोसले (विनामुल्य करियर मार्गदर्शन) आणि सुनील अनुसे (किंजल चॅरिटेबल ट्रस्ट) यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शासकीय नियमांचे पालन करीत मराठी भाषा प्रेमीनी यावेळी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रम समिती प्रमुख विजय पाटील, कोषाध्यक्ष संदीप राऊत, कार्यकारी सदस्य संतोष गायकवाड, शेखर धुरी, भागवत मुर्हेकर आणि सौ. सुषमा राऊत यांनी केले आहे.