
सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना तात्काळ शिधापत्रिका वाटप करा
प्रजा सुराज्य पक्षाचे तहसीलदारांना निवेदन
शिधापत्रिका वेळात न मिळाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने प्रजा सुराज्य पक्षांतर्फे वसई तहसीलदार उज्ज्वला भगत यांना निवेदन देण्यात आले. इतर ठिकाणांहून वसई तालुक्यात स्थलांतरित झालेल्या नागरिकांना शिधापत्रिका वेळत न मिळाल्याने त्रस्त नागरिकांच्या तक्रारीत वाढ होत असल्याचे प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब तिगोटे यांनी सांगितले. शासनाची वेबसाईट बंद असल्याने शिधा पत्रिका देता येत नसल्याचे पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तातडीने प्रजा सुराज्य जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संजूभाऊ तडवी यांनी पक्षाचे अमोल चव्हाण, निलेश वर्तक, ऋषिकेश राठोड व इतर पदाधिकाऱ्यासह वसईचे
निवासी नायब तहसीलदार उमाजी हेळकर यांची भेट घेऊन या प्रकाराबाबत चर्चा करून निवेदन दिले.
मागणी केल्यानंतर नवीन शिधापत्रिका एका महिन्याच्या आत नागरिकांना वाटप करण्याचे शासनाचे आदेश असताना देखील तीन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही नवीन शिधापत्रिका मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
देशभरातून वसई तालुक्यात स्थलांतरित होऊन आलेल्या नागरिकांनी वसई तहसील कार्यालयात नवीन शिधापत्रिकेसाठी रीतसर अर्ज दाखल केले. त्यांना शिधापत्रिका मिळविण्यासाठी सेतू कार्यालयातून पावती देण्यात आली. परंतु तीन महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा त्यांना शिधापत्रिका मिळालेली नाही. याबाबत पुरवठा अधिकारी रोशन कापसे म्हणतात, शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी शासनाची वेबसाईट बंद असल्याने देता येणार नाही. विशेष म्हणजे ऑनलाइन करून सुद्धा दि. ३० जून २०१९ नंतरच्या शिधापत्रिका धारकांना रेशनवर मिळणारे अन्न-धान्य द्यायचे नाही असे शासनाचे आदेश असल्याचे पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांचे म्हणणे आहे. म्हणजे जिवाचा आटापिटा करून गोरगरीबांनी मिळविलेल्या शिधापत्रिका धारकांना रेशनवर मिळणाऱ्या अन्न-धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. मग शिधापत्रिका ऑनलाईन करायची जिद्द पुरवठा अधिकारी कापसे का करीत आहेत असा सवाल तिगोटे यांनी केला आहे. शिधापत्रिका ऑनलाइन करण्याच्या नावाखाली पुरवठा अधिकारी कापसे मनमानी करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य अर्जदारांना महिनोमहिने शिधापत्रिका मिळत नाही. तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांनी हे पुरवठा अधिकारी या पदावर काम करीत असताना ऑनलाईनची समस्या यायची तेव्हा शिधापत्रिकेची छायाप्रत घेऊन नागरिकांना शिधापत्रिका परत द्यायचे आणि ऑनलाइनचे काम करायचे. विद्यमान पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांनाही तसे करता येते, मात्र त्यांना तसे करायचे नाही. यामागे कोणते रहस्य लपले आहे अशी शंका अण्णासाहेब तिगोटे यांनी व्यक्त केली आहे. वसई तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी याबाबत जातीने लक्ष घालून शिधापत्रिका वाटप करून गोरगरीब नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक अण्णासाहेब तिगोटे यांनी केली आहे.