
वसई विरार शहरात पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे तीन दिवस जनजीवन विस्कळीत झाल्याबद्दल , तसेच काही ठिकाणी चार दिवस निचऱ्या अभावी पाणी साचून राहिल्याबद्दल महापालिका प्रशासनाला धारेवर धरत, पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी तालुक्यातील विविध खात्याच्या अधिकाऱ्यांची आज “शाळा ” घेऊन तंबी दिली. शहरातील पूर्वपरिस्थितीबाबत निरी आणि आय आय टी यांनी सुचवलेल्या शिफारसींची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
रविवार आणि सोमवारी झालेल्या पाऊसामुळे साचलेले पाणी लवकर न ओसरल्यामुळे वसईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. तीन-चार दिवस सोसायट्यांमधील पाणी न निघाल्यामुळे जनतेचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालघरचे खा. राजेंद्र गावित यांनी शहरात पाणी साचलेल्या नवघर पूर्वेचे मिठागरे, कृष्णताऊनशिप, अम्बाडी रोड, गिरीज, नालासोपारा (पूर्व,पश्चिम ),सेंट्रल पार्क, एसटी स्टॅन्ड, पोलीस स्टेशन आदी भागास भेटी देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. महापालिका अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. मिठागरातील 400 मजुरांच्या वस्तीला रस्त्याशी जोडण्याचा प्रश्न आपण प्राधान्याने हाती घेत असून, केंद्रीय मंत्रालयाकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी खा. गावित यांनी सांगितले.
सायंकाळी महापालिकेच्या विरार येथील मुख्यालयात खासदारांनी घेतलेल्या महत्वपूर्ण बैठकीस महापालिका आयुक्त बळीराम पवार, प्रांत अधिकारी दीपक क्षीरसागर, तहसीलदार किरण सुरवसे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृष्णकांत सागर, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड, महापालिका अग्निशामक दल आणि विद्युत वितरणचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शहरात झालेल्या अवैध बांधकामावर कारवाई करून, पाण्याच्या निचऱ्याला अडविणारी बांधकामे भुईसपाट करावी, सत्ताधारी नागरसेवकांशी संबंधित जरी कुठे बेकायदा बांधकामे असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करायला हयगय करू नये, पाण्याच्या निचऱ्या अभावी जनतेला पुन्हा
पुन्हा त्रासाला आणि मालमत्ता नुकसानीला सामोरे जावे लागते, ही महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे खा. गावित यावेळी म्हणाले.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख निलेश तेंडोलकर व नवीन दुबे, तालुकाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, शिवसेना गटनेत्या सौ किरण चेन्दवणकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
