
◆कार्याध्यक्षपदी झाकीर मेस्त्री, तर सरचिटणीसपदी शशी करपे
◆ संघाच्या सदस्यांचा आरोग्य विमा उतरविण्याचा निर्णय!
वसई, दि.26(वार्ताहर ) वसई विरार महानगर पत्रकार संघा(नोंदणीकृत) च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे (प्रतिनिधी – दै. पुढारी, दै. नवशक्ती) यांची फेरनिवड करण्यात आली असून, कार्याध्यक्षपदी झाकीर मेस्त्री (संपादक – दै. लढाई न्यायासाठी, वृत्तवाहिनी आज तक ), तर सरचिटणीसपदी शशी करपे (प्रतिनिधी – दै. आपलं महानगर ) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संघावर उपाध्यक्ष म्हणून सुनिल घरत (प्रतिनिधी – दै. लोकमत ) आणि लक्ष्मणराव पाटोळे (संपादक – साप्ता. क्राईम संध्या ) या दोघांना स्थान देण्यात आले असून खजिनदार म्हणून विजय खेतले ( संपादक – दै. वसई विकास ) यांची निवड झाली आहे. यावेळी संघातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला.निर्मळ येथील उषा:काल विश्रामगृहावर वसई विरार महानगर पत्रकार संघाच्या आज झालेल्या वार्षिक सर्वसधारण सभेत पुढील चार वर्षासाठी संघांचे कार्यकारी मंडळ सावनुमते निवडण्यात आले.
सभेच्या प्रारंभी संघाच्या दिवंगत संस्थापक सदस्या, पत्रकार स्व.तृप्ती देसाई, पत्रकार स्व. रमाकांत वाघचौडे, पत्रकार स्व. दत्तराज पाताडे, तसेच साहित्य आणि पत्रकारितेतील अन्य दिवंगताना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच यावेळी संघातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरविण्याची योजना जाहीर करून, त्यासाठी स्वतंत्र निधी उभारावयाची संकल्पना अध्यक्ष रोकडे यांनी मांडली. तसेच या निधी संकलनाची सुरुवात म्हणून स्वतः रु. 25,000/- देण्याची घोषणा त्यांनी याप्रसंगी केली.पत्रकार संघाच्या अन्य कार्यकारिणीमध्ये सहसचिव म्हणून विश्वनाथ कुडू (प्रतिनिधी – दै पुढारी, दै. तरुण भारत ), तर कार्यालय प्रमुख म्हणून चंद्रकांत भोईर (मुक्त पत्रकार ) यांचा समावेश असून, विविध उपक्रम राबविण्यासाठी गठीत केलेल्या कार्यक्रम समन्वय समिती मध्ये जयराज राजीवडे (प्रतिनिधी – वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र), प्रथमेश तावडे (प्रतिनिधी – वृत्तवाहिनी झी न्यूज) आणि मच्छिन्द्र चव्हाण ( संपादक – साप्ताहिक जनहित एक्स्प्रेस ) यांना स्थान देण्यात आले आहे. त्याच बरोबर कार्यकारिणी सदस्य म्हणून रुपेश वाडे (उपसंपादक – दै नरवीर चिमाजी), मिल्टन सौद्या (मुक्त पत्रकार), गुलाम गौस (प्रतिनिधी – सहारा उर्दू), बबलू गुप्ता (वृत्तवाहिनी – न्यूज नेशन), हरिश्चंद्र गायकवाड (प्रतिनिधी – दै वसई विकास) , रतन नायक (मुक्त पत्रकार ) यांची निवड करण्यात आली आहे.