
पाऊस पाणी संकलन करण्याकरीता केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालया मार्फत ‘कॅच द रेन’ अभियानास आज पासून सुरवात करण्यात आली असून आज पालघर जिल्हा परिषद येथे जल शपथ घेण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण आणि आरोग्य समिती सभापती ज्ञानेश्वर सांबरे, जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे, प्रकाश निकम, देवानंद शिंगडे, विनया पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक तुषार माळी, उप.मु.का. अ. संघरत्ना खिल्लारे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा, गंगाधर निवडुंगे तसेच सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय जल मिशन अंतर्गत,जल शक्ती मंत्रालय जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग ,भारत सरकार यांच्या वतीने नॅशनल वॉटर मिशन (NWM) च्या catch the Rain या टॅगलाइनसह ही मोहीम राज्यांना प्रेरित करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
‘कॅच द रेन’ अभियानाअंतर्गत पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी विविध उपाययोजना करावायाच्या आहेत, तसेच जेथे शक्य असेल तेथे पावसाच्या पाण्याचे संकलन करावयाचे आहे. जेणेकरून जमिनीतील भुगर्भातील पाणी साठा वाढेल, पाणी साठा वाढवणे, जिथे पाणी पडते तिथेच अडवणे, सर्व शासकीय इमारतींचे जल संवर्धन करणे, विहिरी बोअरवेल यांचे संवर्धन करणे, काही भागात आजही उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई होत आहे त्या गांवामध्ये पाऊस पाणी संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिग) जर केले तर गावाला पुरेसे पाणी उपलब्ध होईल, हे या मोहिमे मागील उद्देश आहेत.
जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये आणि तालुका तसेच ग्राम स्तरावर देखील ‘कॅच द रेन’ या प्रतिज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.


