
दि. 3 एप्रिल 1935 रोजी धुळे जिल्ह्यातील मोराणे या अतिशय लहानशा व विकासाच्या प्रकाश झोतापासून कोसो दूर असलेल्या खेड्यात भागाबाईच्या पोटी एॅडओकेट माधवराव वाघ यांचा जन्म झाला. हा परिसर तसा विकासाच्या प्रवाहापासून दूर तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा झंजावात येथे येऊन पोहोचला होताच. साहेबांच्या विचार प्रेरणेने नवचैतन्याची बीज इथल्या सर्वसामान्यांच्या मनात अंकुर द्यायला लागलं होतं. त्यामुळेच चार तरणी पोरं तयार असतानांही, डोक्यावर कुणाचाही हात नसताना भागाबाईंच आपल्या पोरांना मोठा करण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. जंगलात जाऊन काट्याकुट्यांची पर्वा न करता मोळी बांधणारे हात थकत नव्हते. कारण त्या हातांना आपल्या मुलांच्या हातात पुस्तक पहायची आस होती. आजूबाजूची लोकं, “इतकी मोठी मुलं असताना देखील कशाला इतकी कष्ट उपसतेस असे म्हणत”. तेव्हा भागाबाईं फक्त एका वाक्यांन त्यांची तोंड बंद करीत. त्या म्हणत, “मला माझ्या मुलांना मजूर नाही बाबासाहेब बनवायचा आहे” आणि याच माऊलीच्या विचार प्रेरणेने मोराणेचा गवा ऊर्फ माधव देशातील नामांकित वकिलाच्या यादीत आपली पकड घट्ट करण्याचा प्रवास सुरू करीत होता. धुळ्यातून मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर माधवरावांनी धुळे सोडण्याचा निर्णय घेतला आणि अंगावरील एक जोडी कपड्यावर अनवाणी पायांनी त्यांनी मुंबई गाठले. सीएसटी स्थानकात ते उतरले. तेथेच राहात रेल्वेच्या पहिल्या नोकरीतून त्यांनी आपल्या व्यावसायिक आयुष्याची सुरुवात केली. त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली . बाबासाहेबाना मधुमेह होता तेव्हा दादांनी बाबासाहेबांचे पाय चेपले. बाबासाहेबांनी त्यांना शिक्षण घेतल्याशिवाय तरणोपाय नाही असा संदेश दिला .अवघ्या 70 रुपयाच्या पगारावर माधवरावांच्या आयुष्याला सुरुवात झाली आणि त्याच अल्प कमाईत ते आपल्या आईला आणि भावाला देखील शिक्षणासाठी पैसे पाठवीत. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी स्वतः देखील विधी शाखेची पदवी मिळवली आणि मग त्यांनी रेल्वेतील त्यांच्या नोकरीला पूर्णविराम दिला.
‘शिका, संघर्ष करा’ या बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेत त्यांनी मोरान्हात राहत असतानाच वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी मुलांसाठी आश्रमशाळा सुरू केली आणि इथूनच दादाच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. 1965 – 66 दरम्यान मोराण्यात त्यांनी विमोचित को-ऑपरेटिव्ह सोसायटी हाउसिंगची स्थापना केली. आयुष्यभर कष्ट उपसलेल्या दादांनी आपल्या सोबतच समाजातील इतर घटकांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देखील कठोर मेहनत घेतली. मुंबईत काम करतांना देखील त्यांनी आपल्या मुळाशी नाळ कधी तोडली नाही. आपल्या तीनही लहान बंधूंची देखील त्यांनी तितकीच काळजी घेतली. अनवाणी पायांनी मुंबईला आलेल्या दादांना सुरुवातीच्या काळात दोन वेळचे जेवणही परवडणारे नव्हते. त्यामुळे दादरच्या इराणी हॉटेलच्या एका आणायच्या थाळीवर त्यांना दोन दिवस काढावे लागेल.
मुंबई स्टेशनवर राहिलेल्या दादांनी या महानगरात येणाऱ्या लोकांची राहण्याची आणि शिक्षणाची अडचण लक्षात घेऊन आश्रमशाळा चांगल्या पद्धतीने चालविली. याच काळात वकिलीच्या क्षेत्रात देखील दादा नावारूपास येत होते. याच माध्यमातून त्यांना समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती सोबत परिचय झाला. त्यामध्ये माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, माजी केंद्रीय गृहमंत्री सुरुसिंग पाटील, वी पी. सिंग ही काही महत्त्वाची नावे. मोरारजी सोबतचे दादासाहेबांची संबंध हे खूपच व्यक्तिगत स्वरूपाचे होते. त्यामुळे त्यांचे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी नेमणूक झाली. मंडल कमिशनच्या समितीवर देखील दादांनी खूप महत्त्वाची कामगिरी पार पाडली. ओबीसी समाजाला करीता देखील दादांनी केलेले काम खूपच मोठे आहे. ओबीसीच्या हक्कासाठी दादांनी काढलेली पुस्तिका आजही आदर्श समजली जाते. याच दरम्यान दादांना अनेक परदेशी दौरे करण्याची देखील संधी लाभली. आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. दलित पॅंथरच्या सुरुवातीच्या काळात दलित समाजातील समस्या सोडविण्याकरिता त्यांनी आपल्या वकिलीचा चांगला उपयोग करून घेतला. शिक्षण आणि पुस्तकाचा निस्सीम चाहता असलेल्या दादांचं वाचनही प्रचंड होतं. त्यांच्या या वाचनाच्या सवयीतूच त्यांनी त्यांच्या गावात वाचनालय आणि शिक्षण संस्था सुरू केल्या. समता शिक्षण संस्था पुणे, युनिव्हर्सल एज्युकेशन अकॅडमी मुंबई, एकलव्य छात्रालय, शिवाजी माध्यमिक महाविद्यालय टाकळी, नालंदा माध्यमिक महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय चाळीसगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे या दादांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्थांनी आता वटवृक्षाचे रूप धारण केलेले आहे.
दादांच्या या कार्याची दखल घेत त्यांना शासनाने अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहेत. कर्मवीर जीवन गौरव पुरस्कार, राज्य शासनाचा समयोद्धा पुरस्कार ही काही महत्त्वाची नावे. दादांनी खानदेश भवनची स्थापना करून खानदेशचा आवाज दिल्लीत नेऊन ठेवला. शिवाय दादांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या दूरदर्शन वरील कोर्टाची पायरी या कार्यक्रमात दादा मधल्या वकिलांसोबत दडलेला निवेदक ही महाराष्ट्राला जवळून पाहता आला. अशा या खानदेशच्या सुपुत्राला आमची आदरांजली…..