

“
● लॉकडाऊनच्या दोन वर्षानंतर प्रथमच सजले रंगीबेरंगी माणसांच्या गर्दीने वसईचे रस्ते!!
● पारंपरिक वेशभूषेत सुमारे १५०० हुन अधिक अबालवृद्धानी घेतला उत्साहात सहभाग
वसई, दि.3(प्रतिनिधी )
विविध सेवाभावी उपक्रमात पालघर जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या “आमची वसई” या सामाजिक समुहातर्फे सालाबादप्रमाणे नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली होती. कार, बाईक आणि सायकल वरून अतिशय शिस्तबद्ध निघालेल्या संयुक्त रॅलीला वसई तालुक्यातील युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला. शोभायात्रेत एकूण १५०० आबालवृद्ध तसेच ३०० दुचाकी, ५० सायकल व १० चारचाकी वाहनांचा समावेश होता. वर्तक इंजिनियरिंग कॉलेज च्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी बनवलेली सौर ऊर्जेवर धावणारी चारचाकी शोभायात्रेची शोभा वाढवत होते. लॉकडाऊनच्या दोन वर्षानंतर प्रथमच रंगीबेरंगी माणसांच्या गर्दीने वसईचे रस्ते सजलेले पाहायला मिळाले.
वसईतील युवक/युवती भगवे फेटे व पारंपरिक वेष परिधान करून शोभायात्रेत सहभागी झाले होते. वैशिष्ट्येपुर्ण बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, नरवीर चिमाजी आप्पा , राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, मावळे, लोकमान्य टिळक, गणपती बाप्पा, शिव पार्वती, श्रावण बाळ यांची वेशभूषा परिधान करून झालेला स्वयंसेवकांचा समवेश यात्रेची शोभा वाढवत होता. जय भवानी- जय शिवाजी, जय वज्राई- जय चिमाजी, भारत माता की जय, वंदे मातरम इत्यादी जयघोषांनी तसेच नाशिक ढोल पथक व रुद्रतांडव ढोलताशा पथकाने अवघा वसई तालुका दुमदुमत होता.
शोभायात्रेचा मार्ग वसई किल्ला, वसई गांव, बाभोळा, गुरुद्वारा ते पंचवटी नाका असा होता. पंचवटी नाका येथे शोभायात्रेचे रूपांतर जनजागृतीपर सभेत झाले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. उपक्रमाचे मुख्य संयोजक, तथा “आमची वसई”चे अध्यक्ष पं हृषीकेश वैद्य यांनी, देव देश धर्म यांप्रती सर्वांच्या मनात निष्ठा असावी, तसेच संस्कृती, परंपराच्या संवर्धनातून एकात्मतेची भावना वाढीस लागून, त्यातून प्रगल्भ समाज उभा राहतो. म्हणून अश्या उपक्रमात युवकांचा सहभाग वाढवा, असे आवाहन या प्रसंगी केले. योगम् हॉस्पिटल चे प्रमुख – डॉ योगेश पाटील यांनी सुदृढ आरोग्य-सुदृढ समाजासाठी अश्या जागृतीपर कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगितले. शिवा संघटनेचे श्री शांतेश्वर घुमते यांनी जात-भाषा सोडून सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले. वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी सामाजिक बांधिलकी व आपल्या परंपरांचे महत्व विशद करून, आमची वसई च्या विविधांगी कार्याचा गौरव आपल्या भाषणात केला. कला दिग्दर्शक बाळा पाटील यांनी आपल्या जीवनात कलेचे स्थान या बाबत उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन केले.
या प्रसंगी चित्ररथात प्रभू श्रीरामचंद्र , सीता, लक्ष्मण ,हनुमान यांचे दरबार चित्र साकारले होते, तर रायरेश्वरावर रुधिराभिषेक करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रतिज्ञा घेतानाचे क्षण दाखवण्यात आले. सोबतच महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे जाते, उखळ मुसळ, सूप इ दाखवण्यात आले होते. स्वरा डान्स गृप तर्फे उत्तम लेझीम सादर करण्यात आले. नायगाव च्या देवेंद्र भाईंदरकर, रंजना चोहान, मिनल भानुशाली, लता खाडे यांनी सुंदर रांगोळ्या साकारल्या. सौ. रोशनी वाघ, रुग्णमित्र राजेंद्र ढगे आणि देवेंद्र गुरव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सौ हेमांगी पवार व कु सायली वाघ यांनी कार्यक्रमाचे मंचसंचालन व निवेदन केले.
कु अवेक्षा घुमरे हिने गणेश कौत्वम्, स्वरा डान्स गृप ने गुढीपाडवा नृत्य, अवंतिका योगा तर्फे गुढीपाडव्याचा सण, अभिनय इन्स्टिट्यूट तर्फे भरतनाट्यम, सौ पल्लवी फौजदार यांनी भरतनाट्यम, कु साक्षी कामत ने नटराज, आशिष कला मंच ने पोवाडा, व हितेश सनगले गृप ने चित्तथरारक मल्लखांब पप्रात्येक्षिक सादर केले.
उत्तम वेशभूषा केलेल्या पहिल्या २५ सहभागींना आकर्शक बक्षीस देण्यात आले.
हा भव्य उपक्रम धर्मसभा, वसई-विरार महानगर पत्रकार संघ, योगम् हॉस्पिटल, वेदमाऊली संस्था , प्रीती ट्रॅव्हल्स, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवा संघटना, फूड-झो, जिजाऊ पैठणी, पतंजली योग गृप, साई पाटील पोल्ट्री व आमची वसई यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच केंद्रीय पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन, महापालिका प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस दल व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा भव्य सोहळा संपन्न झाला.