
पंचायत समिती शिक्षण विभाग पालघर,रोटरी क्लब ऑफ बॉम्बे आणि रोटरी क्लब ऑफ पालघर आणि यांच्या संयुक्त विद्यमाने ११० जिल्हा परिषद शाळांमधील १०,५०० विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असून या शिबिरांमध्ये मुलांचे दात आणि डोळे यांची तपासणी केली जाणार आहे. पालघर तालुक्यातील १७ वेगवेगळ्या शाळांमध्ये दिनांक ११ ते १३ एप्रिल रोजी हि शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
एम.जी.एम. डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, नवी मुंबई आणि मुंबई आय केअर क्लिनिक घाटकोपर, यांचे एकूण चाळीस तज्ञ डॉक्टर विद्यार्थ्यांची तपासणी करणार आहेत. गरजू विद्यार्थ्यांना यावेळी चष्म्यांचे वाटप करण्यात देखील येणार आहे. त्याचबरोबर आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांच्या दातांवर पुढील उपचार सुद्धा केले जातील. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये आरोग्य तपासणी होऊ शकली नाही. त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षण चालू असल्यामुळे जास्तीत जास्त मोबाइलच्या वापर मुलांना करावा लागतो त्यामुळे त्यांचे डोळ्यांची तपासणी करणे खूप गरजेचे झाले आहे. आणि नेमकी हीच गरज ओळखून रोटरी क्लब आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी ह्या शिबिराचे आयोजन केले आहे अशी माहिती यावेळी गट विकास अधिकारी पंचायत समिती पालघर, वैभव साफळे यांनी दिली.