
प्रतिनिधी :
वसई तालुक्यातील शिरवली तलाठी हद्दीत अवैध रेती उपसा होत असून सदर प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली असून महसूल प्रशासन मात्र कारवाईस टाळाटाळ करीत असल्याचे दिसते.
या बाबतची अधिक माहिती अशी की, रेखा मधुकर गवारी यांच्या गाव मौजे शिरवली सर्वे नंबर ५ हिस्सा नंबर १ येथील मालकी जागेतून अवैध रेती उपसा केला जात असून संजय धोत्रे, दिनेश जाधव, परशुराम बसवत, अमृत भोईर, दीपक बरड, रमेश परेड आदि लोक अवैद्य रेती उपसा करीत असल्याची तक्रार रेखा मधुकर गवारी यांनी केली आहे. उप विभागिय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय वसई, मांडवी मंडळ अधिकारी, शिरवली तलाठी कार्यालयाकडे त्यांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्या कारवाईकडे कानाडोळा केला जात आहे.
रेती उपसा करणाऱ्यांनी अर्थातच महसूल प्रशासन अधिकाऱ्यांना मैनेज केले आहे. रेती माफिया अधिकाऱ्यांना लाच देत असल्यामुळे बेधडकपणे रेती चोरी चालू आहे. या संदर्भात कारवाई केली जात नसल्याबद्दल चौकशी करून महसूल खात्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून या संदर्भात मुख्यमंत्री, कोंकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे.