

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाद्वारे संचलित “महिला साठीचे समुपदेशन केंद्र” युवक काँग्रेस च्या आरोपामुळे चर्चेत आले आहे. समुपदेशन केंद्र चालवण्याच्या नावाखाली लाखो रुपये भाजपा सत्ताधारी आणि महिला बालकल्याण विभागातील अधिकारी लाटत असल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेस च्या दीप काकडे यांनी केला.
ओवळा माजिवडा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष दीपक बागरी हे गेले तीन महिने सदर समुपदेशन केंद्राच्या विषयाचा पाठपुरावा करीत आहेत. समुपदेशन केंद्र भाईंदर पूर्वेच्या ज्या गोडदेव परिसरात आहे तेथील ते रहिवासी असून, त्यांच्या पहिल्या प्रथम निदर्शनास आले की हे समुपदेशन केंद्र सातत्याने बंद आहे. दीपक बागरी यांच्या आरोपांनुसार सदर केंद्र ज्या सदनिकेत आहे त्या सदनिकेतील अर्ध्या भागात काही भाडेकरू देखील रहिवाशी म्हणून राहतात व त्याचे भाडे हे सदनिका धारकास जाते. ही शासनाची दिशाभूल आहे.
माहिती अधिकारात ०३ डिसेंबर २०२१ रोजी प्राप्त माहितीनुसार सदर समुपदेशन केंद्रात समुपदेशन घेतलेल्या महिलांची माहिती निरंक आहे. यास कोविड काळ असल्याचे कारण दिले आहे. मात्र, सदर केंद्र संचालनासाठी ज्या कंत्राटदारांस कार्यादेश दिला गेला आहे तो देखील कोविड काळात जून २०२१ महिन्यात काढण्यात आला. याचा अर्थ जाणूनबुजून सदर कंत्राट कंत्राटदारांना आणि पर्यायाने अधिकारी व सत्ताधरी भाजपा नेत्यांना कमिशन मिळवून देण्यासाठी काढले गेले आहे, असा उलट प्रश्न दीप काकडे यांनी उपस्थित केला आहे.
सदर विषयात चौकशी करून दोषी अधिकारीवर बडतर्फी ची कारवाई करून सदर भ्रष्टाचाराचा पैसा त्यांच्या पगारातून, ग्राच्युती अथवा पीएफ मधून वसूल करावा अशी आक्रमक मागणी युवक काँग्रेस च्या वतीने करण्यात आली आहे.