
पालघर जिल्ह्यात हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोगाच्या दुरीकरणासाठी डीईसी आणि अल्बेडॅझॉल गोळ्या देण्याची सामूदायिक औषधोपचार मोहीम २५ मे ते ५ जून दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती पालघर जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी दिली.
तलासरी, विक्रमगड व डहाणू या तीन तालुक्यात सामुदायिक औषधोपचार मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून त्याबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी या उद्देशाने आज डॉ.सागर पाटील यांच्या मार्फत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.
एकदा हत्तीरोग बळावल्यास उपाय नाही. मात्र, हत्तीरोग होवू नये म्हणून डीईसी व अल्बेडॅझॉल गोळ्यांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा अशी सलग ५ वर्षे घेतल्यास हत्तीरोग होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या गोळ्या सेवन केल्याने हत्तीरोगाचा प्रसार होणे बंद होईल. पर्यायाने आपण स्वतः व भावी पिढी हत्तीरोगापासून मुक्त होईल, असेही त्यांनी सांगितले.
या मोहिमेचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दयानंद सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याचे डॉ.सागर पाटील यांनी सांगितले. तसेंच ही मोहीम जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रसारमाध्यमे अतिशय महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन डॉ.सागर पाटील यांनी यावेळी सांगितले.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ६१९ इतके हत्तीरोगाचे रुग्ण आहेत.
वसईमध्ये २६७, पालघर मध्ये १९३,डहाणूमध्ये १३०, तलासरी ७, जव्हार मध्ये ४,मोखाड्यात २, विक्रमगड मध्ये ६, तर वाडा तालुक्यात १० अशी रुग्णसंख्या आहे.
डहाणू विक्रमगड आणि तलासरी या तीन तालुक्यांची लोकसंख्या ८ लाख ४९ हजार ९८४ इतकी असून गर्भवती महिला,अति गंभीर रुग्ण, दोन वर्षा खालील बालके वगळता ७ लाख २२,५०० इतके लाभार्थी या मोहिमेसाठी पात्र आहेत.
सहा दिवस प्रत्येक घरी जाऊन कर्मचारी हत्तीरोग विरोधी औषधे प्रत्यक्ष देणार असल्याची माहिती डॉ.सागर पाटील यांनी दिली.