
जिल्हाधिकारी यांच्या एका चुकीच्या आदेशाने पापडी येथे केले सात घरानां बेघर?
प्रतिनिधी :
पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील वसई येथील जवळपास १५ वर्षांपासून असलेली घरे तोडून रहिवाशांना बेघर करणाऱ्या अनिलकुमार सावंत याच्यावर गुन्हे दाखल करण्यास वसई पोलीस टाळाटाळ करीत असल्याचे दिसते. या संदर्भात ७ जणांनी पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, गाव मौजे धोवली सर्वे नंबर १०४ / अ येथील ३ एकर २० गुंठे शासकीय भूखंड अनिलकुमार वामन सावंत नामक इसमाला देण्यात आला असून त्याच्या नावे सात बारा घडविण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रीया अत्यंत जलदगतीने पूर्ण करण्यात आली. मुळात शासकीय भूखंड अनिलकुमार वामन सावंत याला का देण्यात आला हा प्रश्न आहे.
या भूखंडावर २० झोपड्या होत्या. त्या २० झोपड्यांवर अनिलकुमार वामन सावंत याने बुलडोजर फिरवून त्या झोपड्या तोडून टाकल्या. लोकांना धमक्या देऊन घरातून बाहेर काढून त्यांच्या घरावर बुलडोजर फिरविणे हा गंभीर गुन्हा असून सदर प्रकरणी अनिलकुमार वामन सावंत याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
सदर ठिकाणी राहणारे रहिवासी ज्यांची घरे अनिलकुमार वामन सावंत याने तोडून त्यांना बेघर केले आहे ते सर्व लोक गरीब असून त्यांना कोणी वाली नाही!
ज्या झोपड्या तोडण्यात आल्या त्या १५ वर्षे जुन्या होत्या. नियमानुसार १२ वर्षे वास्तव्य असेल तर त्या वास्तुवर कब्जाधारकाची मालकी होते. अनिलकुमार वामन सावंत याला ही गोष्ट माहीत आहे. त्यामुळे कायदेशीर मार्गाने सदर रहिवाशांना हटविणे अशक्य असल्यामुळे अनिलकुमार वामन सावंत याने रहिवाशांना धमकावून त्यांना घरे खाली करायला लावून ती घरे तोडून टाकली.
घरे तोडल्या प्रकरणी कारवाई व्हावी म्हणून ७ तक्रारदारांनी तक्रार करून वसई पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्याकरिता आग्रह करीत होते मात्र पोलिसांनी गुन्हे दाखल न करून विकासक अनिलकुमार वामन सावंत याला पाठीशी घालण्याचे उद्योग सुरू केले आहेत. या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलले जाते.