
बचत गटांच्या स्टॉलला उत्तम प्रतिसाद
नवी मुंबई, दि. 20 :- बचत गटांची उत्पादने शहरी भागात अधिकाधिक विक्री होण्यासाठी त्या उत्पादनांचा दर्जा, मांडणी आणि सजावटीसह पॅकेजिंगकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. असे मत
उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई नेरुळ येथील सेक्टर 18 या ठिकाणी असलेल्या विद्याभवन शाळेच्या आवारात उमेद अंतर्गत स्थापित महिला स्वयंसाह्ययता समुहांनी पिकवलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दि. 20 ते 22 ते 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या “आंबा आणि तांदूळ महोत्सवाच्या” उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोकण विभागीय माहिती उपसंचालक, डॉ. गणेश मुळे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या उपसंचालक शीतल कदम, पुणे विद्यार्थी गृह, विद्याभवन शैक्षणिक संकुलाचे संचालक दिनेश मिसाळ, स्माईलस् फाउंडेशनचे कार्यवाहक धीरज आहुजा आणि अध्यक्ष श्रीमती उमा आहुजा तसेच स्माईलस् फाउंडेशनचे सदस्य शालिनी विधानी, शेफाली नायर, सुरजित सिंग आदि मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवात सहभागी झालेल्या बचत गटांना मार्गदर्शन करताना श्री. परमेश्वर राऊत म्हणाले की, स्थानिक स्तरावरील बचत गटांनी आपल्या उत्पादनांचा दर्जा वाढविण्याकडे लक्ष द्यावे. आपण उत्पादित केलेल्या वस्तू ह्या शुध्द आणि नैसर्गिक व सेंद्रिय आहेत, परंतु त्यांची विक्री वाढविण्यासाठी त्यांचे सदरीकरण सुंदर आणि ग्राहकांना आकर्षित करणारे असावे. यासाठी बाहेरील बाजार पेठांचा, उत्पादकांचा त्यांच्या उत्पादनाचा अभ्यास करण्याची गरज आहे. एकदा खरेदी केलेली वस्तू ग्राहकाने पुन्हा खरेदी करावी करावी यासाठी ग्राहकांचे संपर्क क्रमांक नोंदवून घ्यावे, ग्राहकांना संपर्क करावा, त्यांना आपल्या उत्पादनाविषयीचा अभिप्राय विचारावा व त्यानुसार आपल्या उत्पादनात बदल आणि उत्पादनाचे प्रकार वाढवावेत असे सांगून श्री. राऊत यांनी सर्व बचतगटांना शुभेच्छा दिल्या.
या महोत्सवाचे उद्घाटन कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. नावीण्यपूर्ण वस्तू खरेदीसाठी नवीमुंबईकरांनी या “आंबा आणि तांदूळ महोत्सवाला” भरभरुन प्रतिसाद द्यावा असे आवाहन डॉ. गणेश मुळे यांनी यावेळी केले.
या महोत्सवाच्या आयोजनासाठी विद्या भवन, स्माईलस् फाउंडेशन आणि उमेद (MSRLM) च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष श्रम घेतले.