नालासोपारा आणि वाडा शाखेच्या पुनर्बांधणीचा ठराव संमत!

पालघर, दि.29(प्रतिनिधी ) कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हा कार्यकारी मंडळाच्या शनिवारी सायंकाळी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या विशेष सभेत परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी वसई शाखेचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कोमसापचे संस्थापक अध्यक्ष, तथा ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी नवनियुक्त कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे आणि सर्व जिल्हा कार्यकारिणीचे अभिनंदन करून, परिषदेच्या कार्यासाठी नव्या जिल्हा मंडळाला शुभेच्छा यावेळी दिल्या.

      यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा सौ नमिता कीर, परिषदेच्या केंद्रीय नियामक मंडळाच्या सदस्य, तथा राज्याच्या महिला विकास मंडळाच्या (राज्यमंत्री दर्जा ) अध्यक्षा सौ ज्योती ठाकरे, महिला साहित्य संमेलन समितीच्या कार्याध्यक्षा प्रा. सौ. स्मिता पाटील, पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे, तसेच जिल्ह्यातील सर्व शाखांचे अध्यक्ष व शाखा प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तांत्रिक कारणास्तव बरखास्त असलेल्या
नालासोपारा आणि वाडा शाखेच्या पुनर्बांधणीचा ठराव संमत करण्यात आला. तसेच पालघर येथे दि.11 व 12 जून 2022 रोजी होऊ घातलेले कोमसापचे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन अधिक जोमाने यशस्वी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

          दि. 12 डिसेंबर 2021 रोजी मालगुंड येथे कवी केशवसूत स्मारकात झालेल्या कोमसापच्या केंद्रीय मंडळाच्या सर्वसाधारण सभेत पालघरचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रवीण दवणे यांचे नांव घोषित करण्यात आले होते. त्याबद्दल जिल्हा कार्यकारी मंडळाच्या कालच्या पहिल्या बैठकीत दवणे यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात येऊन, जिल्हा मंडळाची अन्य कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात जिल्हा शाखेचे नवे कार्याध्यक्ष म्हणून वसई शाखेचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांचे नांव श्री दवणे यांनी सुचवताच त्यास सर्वांनी एकमुखाने अनुमोदन दिले. त्याच बरोबर जिल्हा शाखेचे सचिव म्हणून उमाकांत वाघ (विरार ), कोषाध्यक्ष म्हणून जयेश शेलार (वाडा ), केंद्रीय समितीसाठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून सुहास राऊत(पालघर ), तसेच जिल्हा कार्यकारीणी सदस्य म्हणून सौ अंजली मस्करणीस (डहाणू ), रमाकांत पाटील (पालघर ), संजय घरत (बोईसर-तारापूर ), रवी बुधर (जव्हार ) यांच्या निवडी एकमताने यावेळी करण्यात आल्या. त्याचबरोबर तांत्रिक कारणास्तव बरखास्त असलेल्या नालासोपारा आणि वाडा शाखेच्या पुनर्बांधणीचा ठराव यावेळी संमत करून, नालासोपारा आणि वाडा शाखेच्या पुनर्बांधणीसाठी अनुक्रमे अनिलराज रोकडे आणि जयेश शेलार यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आले. यावेळी वसई शाखा प्रतिनिधी आनंद गदगी आणि डहाणू शाखेच्या माजी अध्यक्षा सौ विणा माच्छि आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *