
पारोळ
मुंबई – वडोदरा राष्ट्रीय महामार्ग मध्ये परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची जमीन बाधित झाली असून मागील काही दिवसांमध्ये बनावट कागदपत्रे बनवून शेतकऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक झाल्याप्रकरणी ‘विजया फार्म, घोटगाव, अंबाडी, ता. भिवंडी, जि. ठाणे येथे आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे संचालक डॉ. दिपेश पष्टे यांच्या माध्यमातून ‘आपले मानवाधिकार जनता दरबार व शेतकरी पत्रकार परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत आमच्या जमिनी भूमाफियानी महसूल अधिकारी यांच्या मदतीने लाटल्या असल्याचा असतो बाधित शेतकरी यांनी केला
परिसरातील महसूल विभागाचे काम किती बेजबाबदारपणे केले जाते हे पुराव्यासह कागदपत्रे सादर करून डॉ. दिपेश यांनी दाखवून दिले. सदरचा संपूर्ण प्रकार महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात यांना दाखवून चौकशी करायला लावून पिडीत शेतकऱ्यांची जमीन मिळवून देणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. बाधित शेतकऱ्यांना दलाल, तलाठी, सर्कल, भूमीअभिलेख कार्यालय, तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय या सर्व ठिकाणाहून कसे फसवले याची संपूर्ण माहिती स्पष्ट आणि उघडपणे जाहीर केली तर पीडित शेतकरी हरेश पाटील व संदीप राऊत यांना अधिकाऱ्यांनी कसे छ्ळले याबद्दल माहिती दिली.
खरेदीखत करताना कुलमुखत्यार असा उल्लेख असताना ते जोडले नाहीत, एकाच व्यक्तीचे फोटो लावून दोन वेगळी नावे, सही केलेल्या ठिकाणी तिसऱ्या व्यक्तीचा साक्षीदार म्हणून फोटो लावणे, फोटोवर न लावता बाहेर अंगठा, खरेदीखत केलेल्या दस्तऐवजावर सहीच नाही किंवा अन्य काही नाही असे बरेचसे पुरावे पष्टे यांनी पत्रकार परिषद मध्ये मांडले. तर भुमिअभिलेख मधून अधिकारी यांनी जागा मोजमाप करून पीडितांच्या सह्या घेऊन वर्ष होत आले तरी सुद्धा जागा किती मोजणी केली, हे सादर केले नाही. अधिकाऱ्यांची सुट्टी संध्याकाळी पाच वाजता होते तर मग आमच्या वडिलांना रात्री दहा वाजता का नेले होते, असा प्रश्न मयत पीडिताच्या मुलीने उपस्थित केला.
पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्व अधिकारी यांना केलेल्या प्रकाराचा खुलासा मागवत आहोत; आणि जर दहा दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्यास सर्व अधिकार्यांवर बाधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून खोटी कागदपत्रे तयार करून शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हे नोंद करून संपूर्ण चौकशीची मागणी महसूल मंत्री मा. थोरात साहेब यांच्याकडे करू, अशी ग्वाही डॉ. दिपेश पष्टे यांनी पीडित शेतकऱ्यांना दिली. यावेळी परिसरातील पोलीस पाटील, प्रतिष्ठित शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, परिसरातील सर्व माध्यमांचे पत्रकार, पीडित शेतकरी, गणेशपुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच आपले मानवाधिकार फाउंडेशनचे पदाधिकारी व इतर शेतकरी उपस्थित होते.