
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांनी आयोजित केलेल्या “राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर” महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री नामदार श्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि माजी मुख्यमंत्री नामदार श्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले आणि या प्रमुख मान्यवरांनी सभेला मार्गदर्शन करून जोश निर्माण केला.
तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्षाचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार श्री शंकरराव गडाख हेदेखील उद्घाटन समारंभास उपस्थित होते.
या शिबिरासाठी पर्यावरण विभागाचे संपूर्ण महाराष्ट्रातुन प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष आलेले असून उद्घाटन कार्यक्रमानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ प्रो सागर धारा आणि भारतीय पर्यावरण चळवळीचे ऍड गिरीश राऊत यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
आजच्या “राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराच्या” दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात पर्यावरण तज्ञ आणि वनशक्ती संस्थेचे संचालक श्री दयानंद स्टॅलिन आणि पर्यावरण या विषयात प्रशासकीय सेवेबरोबर काम करणारे श्री योगेश राऊत यांनी पर्यावरण विषयक प्रश्न आणि प्रशासनाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण शिबिराच्या शेवटच्या सत्रात राष्ट्रीय फेरीवाला संघाचे (NHF) राष्ट्रीय महासचिव आणि युवा संस्थेचे सल्लागार श्री मॅकेन्झी डाबरे यांनी हवामान बदल व पर्यावरण संदर्भात कष्टकरी जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत माहिती देतांनाच यावर मात कशी करावी त्याबद्दल मार्गदर्शन केले. आणि युवभारत चे श्री शशी सोनावणे यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी चळवळ आणि आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला नमविण्यासंदर्भात मार्गदर्शन करून जनतेच्या प्रश्नांवर संवेदनशील काँग्रेस पक्ष आणि असंवेदनशील भाजपा पक्ष हा फरकही दाखवून दिला.
शेवटी उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष म्हणून चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष श्री ताज कुरेशी यांना प्रथम, वसई विरारचे जिल्हाध्यक्ष श्री डेरीक फुरताडो यांना द्वितीय आणि पिंपरी चिंचवडचे श्री अक्षय शहरकर व पुणे ग्रामीणचे श्री तन्मय पवार यांना विभागून तृतीय क्रमांकाचा पुरस्काराने सन्मान केला. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना “राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे” प्रमाणपत्र देऊन या दोन दिवसीय शिबिराची सांगता झाली.