

जव्हार (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये पिंपळशेत पैकी खरोंडा या गावात एक धक्कादायक घटना कल घडली आहे. गरिबीला कंटाळून आईने आपल्या दोन मुलींना विष पाजले यात दोघींचा मृत्यू झालाय तर एक मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.रुक्षणा जीवल हांडवा असे या आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री विवेक पंडित आज जव्हार मध्ये दाखल झाले. या घटनेतून सुदैवाने बचवलेल्या आणि जव्हार कुटीर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वृषाली (वय-८ वर्ष) हिच्या प्रकृतीची विचारपूस पंडित यांनी केली, तद्नंतर या कुटुंबाच्या गावालाही पंडित यांनी भेट दिली.
ही घटना खरंच हृदयद्रावक असून मी या घटनेने प्रचंड अस्वस्थ झालो आहे अशी भावुक प्रतिक्रिया यावेळी विवेक पंडित यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गांभीर्याने दखल घेतली असून विवेक पंडित यांच्याशी याबाबत चर्चा केली, आजच्या भेटीत मुख्यमंत्री यांनी वैयक्तिक स्तरावर मातृछत्र हरपलेल्या तिनही बालिकांना वयाच्या अठरा वर्षापर्यंतच्या मुदतीच्या प्रत्येकी दोन दोन लाखाच्या मुदत ठेवी घोषित केल्या.
जव्हार तालुक्यातील पिंपळशेत पैकी खरोंडा या गावातील रुक्षणा या आदिवासी महिलेने मुलींना विष पाजून स्वत:ही विष घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रुक्षणा या आपल्या चार मुलींसह इथे राहतात. जुनमध्ये त्यांच्या नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर या कुटुंबाची परवड सुरू झाली त्याला कंटाळून रुक्षणा यांनी घरी असलेल्या दोन मुलींना विष पाजलं आणि स्वत:ही आत्महत्या केली. पतीच्या निधनानंतर रुक्षणा यांचा आधारच गेला होता. पाचवीला असलेलं दारिद्रय, लहान मुली, रोजगाराचा अभाव यामुळे पैसेही नाहीत. त्यामुळे कुटुंबाचं पोट कसं भरायचं या विवंचनेत त्या त्रासून गेल्या होत्या. दररोजच्या जेवणाचीही भ्रांत असल्याने त्यांनी घरी असलेल्या दीपाली आणि वृषीली या मुलींना विष पाजलं आणि स्वत:ही विष घेऊन आत्महत्या केली. वृषीली ही फक्त ८महिन्यांची आहे. तिने उलटी केल्याने तिचा जीव वाचला. तिच्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मयत रुक्षणा हिच्या दोन मुली ह्या खरोंडा येथील जिल्हापरिषद शाळेत शिक्षण घेतात.त्या पैकी मोठी मुलगी कुमारी सुमंत ही इयत्ता ३ री व जागृती ही इयत्ता १ ली मध्ये आहे. रुक्षणा हिच्या मृत्यू नंतर तीनही मुलींचे मातृछत्र हरपले आहे. पुढील शिक्षणासाठी कुमारी सुमत व जागृती यांना जवळ असणाऱ्या देहेरे शासकीय आश्रम शाळेत निवासी प्रवेश द्यावा असे निर्देश यावेळी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी जव्हार प्रकल्प अधिकारी यांना दिले आहेत.
तसेच लहान मुलगी वृषाली (वय-८ महिने) हिच्या नातेवाईकांसाबत बोलून बालगृहात ठेवण्याची व्यवस्था करण्याबाबत ठरवेल जाईल असेही त्यांनी सांगितले.
पंडित यांनी याबाबत येथील प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही गरीब आदिवासींना भुकेशी आणि दारिद्र्याशी संघर्ष करून आत्महत्या करावी लागणे हे खरंच दुर्दैवी असल्याची खंत पंडित यांनी व्यक्त केली.यावेळी प्रकल्प अधिकारी डॉ. अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कांचन वानेरे, तहसीलदार संतोष शिंदे यांसह इतर अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.