कार्डिनल हॉस्पिटलच्या व्यवस्थापक समितीचा डॉ.पुनम वानखेडे यांना वाचविण्याचा प्रयत्न ?
कार्डिनल हॉस्पिटलसमोर सेठी कुटुंबियांचे धरणे आंदोलन
चुकीच्या उपचार पध्दतीमुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

वसई (प्रतिनिधी)– वसई तालुक्यातील नामांकित कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये मे महिन्यामध्ये डॉ.पुनम वानखेडे यांनी लक्ष्मी अनिल सेठी (वय ४४) या महिलेवर केलेल्या चुकीच्या उपचार पध्दतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला होता. याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी नातेवाईकांनी मुख्यमंत्री, मेडिकल कौन्सिल, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य मंत्री अशा विविध ठिकाणी तथा कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलच्या व्यवस्थापक समिती या सर्वांकडे डॉ.पुनम वानखेडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती व याबाबत १ महिन्याची मुदत दिली होती. तरी अद्याप डॉ.पुनम वानखेडे यांच्यावर कारवाई झाली नाही. व्यवस्थापक समिती डॉ.पुनम वानखेडे यांना पाठिशी घालत असल्याचं पुढे येत आहे. तक्रारदाराला अद्यापही कोणत्याही प्रकारचे साधे उत्तर देखील व्यवस्थापक समितीने दिले नाही. डॉ. पुनम वानखेडे यांना तात्काळ बंगली हॉस्पिटलमधून काढावे तथा त्यांना निलंबित करावे व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी सेठी कुटुंबा तर्फे काल बंगली हॉस्पिटलसमोर शांततेच्या मार्गाने एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन केले. कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटल व्यवस्थापक समिती ही डॉ.पुनम वानखेडे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सेठी कुटुंबियांनी केला आहे.
लक्ष्मी सेठी यांना दि.१४ एप्रिल रोजी आजारी असल्याने उपचारासाठी कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उपचाराचा चार्ज डॉ.पुनम वानखेडे यांनी घेतला आणि त्यांची तपासणी करुन त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करुन उपचार सुरु केले व एक आठवड्याने डॉ.पुनम वानखेडे यांच्याकडे रुग्णाच्या तब्येतीबाबत वारंवार चौकशी केली असता त्यांनी सदर रुग्णास टी.बी. असून चिंता करण्याचे कारण नाही, एक महिन्यात त्या ठीक होतील असे सांगितले. नंतरच्या काळात त्यांनी अजून वेगवेगळ्या चाचण्या केल्या परंतु लक्ष्मी सेठी यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत गेली. एवढेच नसून त्यांना भयंकर वेदना होत होत्या. त्यासाठी आम्ही वारंवार डॉ. पुनम वानखेडे यांची भेट घेऊन सत्यपरिस्थिती जाणण्याचा प्रयत्न करत होतो परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद अथवा माहिती दिली नाही असे त्यांचे नातेवाईक म्हणाले.शेवटी हतबल होऊन स्थानिक खाजगी डॉक्टर संतोष पिल्ले यांच्याकडे सेकंड ओपिनियन घेण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले.६ मे रोजी रात्री भेटून सर्व परिस्थिती कथन केली व त्यांना एकदा स्वतः येऊन लक्ष्मी सेठी यांची तपासणी करावी अशी विनंती केली.
त्यानुसार दिनांक ७ मे रोजी पहाटे ६.३० वाजता डॉ. पिल्ले यांनी जाऊन रुग्णाची तपासणी केली व थोड्याच वेळात त्यांनी लक्ष्मी सेठी यांना कॅन्सर असण्याची शक्यता व्यक्त केली व लगेच बायोस्पी, अँडोस्कॉपी करुन घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाईकांनी ही टेस्ट करुन घेतली. दि. १३ मे रोजी त्याचा रिपोर्ट आला त्यामध्ये लक्ष्मी सेठी यांच्या पोटात गाठ आढळून आली. तरीसुध्दा डॉ. पुनम वानखेडे यांनी ती गाठ टी.बी.ची असल्याचा दावा केला व औषधे सुरु ठेवली. शेवटी आपण आमची केस बिघडवली आहे असे त्यांना सुनिल सेठी यांनी स्पष्ट सुनावले असता त्यांनी त्यांच्याबरोबर असभ्य व मग्रुरीच्या भाषेत वाद घातला. सदर प्रकरणी तोंडी तक्रार हॉस्पिटल ट्रस्टी फ्रान्सिस कुटीनो (चेअरमन) व अन्सेंस परेरा (वाईस चेअरमन) तसेच जनरल मॅनेजर फ्लोरी मॅडम यांच्याकडे केली. डॉ. पूनम वानखेडे यांच्या चुकीच्या उपचार पध्दतीमुळे आणि वेळेवर डायग्नोसिस न केल्यामुळे लक्ष्मी सेठी यांच्यावर कॅन्सवरचे उपचार करणेसुध्दा कठीण झाले होते. हेच वेळेवर डायग्नोसिस केले असते तर २०-२५ दिवस अगोदरच कॅन्सरचे निदान झाले असते व त्यांच्यावर वेळेवर उपचार करु शकलो असतो. दि. २७ मे रोजी हॉस्पिटलने नातेेवाईकांकडे लक्ष्मी सेठी यांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास डॉक्टर, हॉस्पिटल अथवा स्टाफ जबाबदार राहणार नाहीत असे पत्र लिहून मागितले. ते देण्यास नातेवाईकांनी नकार दिला. अशा चुकीच्या उपचार पध्दतीमुळे लक्ष्मी अनिल सेठी यांचा दिनांक ३० मे रोजी दुपारी २.२० मि. यातनामय मृत्यू झाला. या सर्वबाबत प्रशासन, डॉक्टर व संबंधित अधिकार्‍यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी नातेवाईकांची मागणी आहे. अद्यापही डॉ.पुनम वानखेडे यांच्यावर कारवाई न झाल्यामुळे काल सेठी कुटुंबिय आपल्या मित्रपरिवारासह बंगली हॉस्टिपलसमोर शांततामाय एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनास बसले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *