
वसई ( प्रतिनिधी ). वसईच्या तहसीलदार कचेरीत गेल्या काही दिवसापासून कोणीही वरिष्ठ अधिकारी नाही त्यामुळे नागरिकांची कामे होत नसून तहसीलदार कचेरी ओस पडली आहे. नायब तहसीलदार प्रदीप मुकणे व मंडळ अधिकारी संजय सोनावणे यांना लाच प्रकरणी दि. ४ जुलै रोजी अटक करण्यात आली. महसूल विभागातील नायब तहसीलदार उमाजी हेळकर हे मे महिन्यात सेवानिवृत्त झाले त्यामुळे हें पद रिक्त आहे. आताच दहावी व बारावीचा निकाल लागल्यामुळे विद्यार्थी वर्गाला शासकीय दाखले मिळण्यासाठी अडचणीना तोंड द्यावे लागणार आहे. वसई तहसीलदार ह्यांच्या दोन वर्षाच्या कालखंडात एक नायब तहसीलदार, दोन तलाठी व दोन मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे मार्फत कारवाई केली आहे . वसई तहसीलदार याचं कुठल्याही प्रकारचे वचक अधिकाऱ्यांवर राहिलेलं नाही . त्यामुळे
वसई तालुक्यात महसूल विभागातील वाढत्या भ्रष्टाचारामुळे जनसामान्यातून संताप व्यक्त होत आहे. वसई तहसीलदार कार्यालयात पुरवठा विभागावर कुठलेही नियंत्रण नसून कार्यालयात खाजगी माणसांकडून सुट्टीच्या दिवशी रेशन कार्ड बनवायचा प्रकार पत्रकारांनी नुकताच उघडकीस आणला होता. वसई सेतू कार्यालयात दलालांनचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट असून त्यांच्यावर तहसीलदारांचा कुठल्याही प्रकारचा वचक राहिलेला नव्हता. वसई तालुक्यात गेल्या दोन वर्षाच्या तहसीलदार यांच्या कालखंडात शासकिय जागेवर अनधिकृत बांधकामे फोफावली असून त्यावर वसई तहसिलदार कडून जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जात होते. वसई खाडीतील अनिर्बंध बेकायदा वाळू उपसामुळे किल्लाबंदर, पचुबंदर किनाऱ्याची वाताहत होत आहे.
आदीवासिंच्या जागांवर गडांतर आणणाऱ्या भूमाफियांना वसई तहसीलदार पाठीशी घालत असल्याचा आरोप करून आदिवासी महिला एकता परिषदेच्या अध्यक्षांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती.
परिणामी वसई तहसीलदार कार्यालयातील या तहसीलदारांच्या ऐवजी नागरिकांची कामे करणाऱ्या सक्षम तहसीलदाराची व आता रिक्त झालेल्या दोन नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे . गेल्यावर्षीपासून महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे वसई मध्ये सक्षम तहसीलदाराची नियुक्ती करावी अशी मागणी केली होती. आता पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते तथा मा.वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी माननीय मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या कडे मागणी केली आहे.