
तब्बल दोन वर्षांचा संयम फलद्रूप
प्रतिनिधी
विरार- पराकोटीचा संयम आणि पक्षाप्रतिची बांधिलकी याचे फलित म्हणून तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिवसेना युवा पंकज देशमुख यांची वसई-नालासोपारा विधानसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकातून ही महिती देण्यात आली आहे.
पंकज देशमुख यांची उपजत नेतृत्व गुण, राजकीय प्रगल्भता, आत्ममर्पित भाव, दूरदृष्टी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती या त्यांच्यातील वैशिष्ट्यांची वसई, नालासोपारा आणि विरार शहरात शिवसेना संघटना वाढीस मदत होणार आहे.
२०२० साली पंकज देशमुख यांनी बहुजन विकास आघाडीतून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला होता. बहुजन विकास आघाडीतील एकाधिकारशाही झुगारून स्वाभिमानाने बाहेर पडणारे बविआच्या तीस वर्षांच्या राजकीय इतिहासातील ते प्रथम व्यक्ती होते. साहजिकच वसईच्या राजकारणात त्यांची विशेष अशी दखल माध्यमांनी घेतली होती.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही त्यांच्या संयमाची कसोटी लागली होती. कित्येक वेळा त्यांना विरोधकांच्या टीकेचा भडिमारही सहन करावा लागला; मात्र त्यांनी पदासाठी किंवा अन्य जबाबदारीकरता कधीच आततायीपणा केला नाही. संयम सोडला नाही. उलट पक्षासोबतची बांधिलकी जपतानाच त्यांनी आपले काम सुरू ठेवले होते. शिवसेना संघटनेकरता कार्यक्रम, उपक्रमांचे नियोजन केले होते. शिवाय जाणीवपूर्वक स्वतःला या कामांच्या प्रसिद्धीपासून दूर ठेवले.
या काळात जनसंपर्क वाढवण्यावर मात्र त्यांचा भर राहिला. नम्र स्वभाव, सकारात्मक वृत्ती, राजकीय-सामाजिक दूरदृष्टी, समज आणि वरिष्ठ नेत्यांसोबत असलेले सौहार्दपूर्ण संबंध यामुळे पंकज देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग नालासोपारा आणि वसई-विरार शहरात आहे.
त्यांच्यातील या सर्वांगीण गुणांची शिवसेना पक्षवाढीसाठी होणारी मदत लक्षात घेऊनच नालासोपारा-वसई जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करून त्यांचा गौरव करण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.
दरम्यान; ठाणे, पालघर, भिवंडी जिल्हा समनवयक पदी उत्तम पिंपळे, तर पालघर लोकसभा संपर्क प्रमुख पदी केतन पाटील यांची नियुक्ती झाली आहे. अन्य पदाधिकारी निवडही झाल्या आहेत.
अखेर शिवसेना युवा पंकज देशमुख यांची वसई-नालासोपारा विधानसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती!