वसई शिवसेनेचा बेमुदत आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी

विरार- वसई प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व वसई-विरार महापालिकेचे आयुक्त यांच्यासोबत वारंवार पत्रव्यवहार करूनही कारवाई केली गेली नसल्यानेच वाघराळपाडा येथे दरड कोसळून दोघांना नाहक आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे या दुर्घटनेला कारणीभूत दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा; अन्यथा वसई पोलीस उपायुक्तालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वसई शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

या आशयाचे पत्र शिवसेना उपतालुका प्रमुख ऍडव्होकेट अनिल चव्हाण यांनी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तांना सोमवारी दिले आहे.

वसई-वाघराळ पाडा येथे १३ जुलै रोजी सकाळी ७च्या सुमारास एका चाळीवर दरड कोसळली होती. या दुर्घटनेत एका कुटुंबातील आई आणि मुलगा जखमी झाला होता. तर वडील आणि मुलीचा ढिगाऱ्याखाली अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता.

या प्रकरणात वसई पोलिसांनी चाळ बांधकाम करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल केले असले तरी; या घटनेस दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले नाहीत.

वसई-वाघराळ पाडा येथील शेकडो एकर जागेवर असलेल्या वनविभाग व खासगी जागेवर भूमाफियांनी मागील काही वर्षांत अतिक्रमण केलेले आहे. या जागेवर वसईला समांतर शहर वसवण्याचे काम या भूमाफियांच्या माध्यमातून सुरू आहे.

शेकडो चाळींच्या स्वरूपात हजारो घरांची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे. दोन लाख रुपयांपासून ८ लाख रुपयांपर्यंत या ठिकाणी घरे विकली जात असल्याने मोठ्या प्रमाणात गरीब मजूर व कामगार या ठिकाणी घरे घेत आहेत. कमी किमतीचे आमिष दाखवूनही अनेक लोकांची भूमाफियांची फसवणूक केलेली आहे.

वसई-विरार महापालिकेची कोणतीही परवानगी या अनधिकृत बांधकामांना नसल्याने नियोजनाअभावी बोजवारा उडालेला आहे. रस्ते, पाणी, वीज अशा सुविधांअभावी दुसरी धारावी या ठिकाणी उभी राहिलेली आहे. त्यामुळे या भूमाफियांनी लाखो लोकांना नरकयातनांत लोटले आहे. मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांचा या वस्तीत भरणा असल्याने गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे.

विशेष म्हणजे वसई-विरार शहराला समांतर शहर वसवण्यासाठी पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करण्यात आलेली आहे. उंचच उंच डोंगर भुईसपाट करण्यात आलेले आहेत. शेकडो वृक्षावर कुऱ्हाड चालवण्यात आलेली आहे. हजारो ब्रास माती खोदून त्यापोटीची रॉयल्टी बुडवण्यात आलेली आहे. नैसर्गिक नाले वळवून त्या ठिकाणी भराव करण्यात आलेला आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी करून या ठिकाणी काम सुरू असतानाही वसई-विरार महापालिका व तहसील कार्यालयाने धृतराष्ट्राची भूमिका घेतलेली होती.

या संदर्भात २०२१ पासून शिवसेना उपतालुका प्रमुख अडव्होकेट अनिल मोहन चव्हाण यांनी वारंवार वसई-विरार महापालिका आयुक्त, वसई प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी वसई यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला होता. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याही त्यांनी ही बाब निदर्शनास आणली होती.

मात्र या सर्वांनीच या पत्रांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले; याचे परिणाम म्हणून वाघराळ पाडा येथे दरड कोसळून नाहक दोघांना प्राण गमवावा लागला असल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान; या प्रकरणात बांधकामधारकांविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी घटनेस दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ऍड. अनिल चव्हाण यांनी केली आहे. अन्यथा; वसई पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही चव्हाण यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रातून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed