तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायु दुखी व सांधे दुखणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे असलेला झिका विषाणूचा रुग्ण
तलासरी तालुक्यात आढळला असून तसेच जिल्ह्यात माहे जानेवारी पासून ५९ डेंग्यू व १० चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले असून, वरील सर्व आजारांच्या प्रसारास एडिस प्रजातीचा डास / मच्छर कारणीभूत असून या डासांची पैदास घरातील व घराच्या आवारातील साठलेल्या स्वच्छ पाण्याच्या साठ्यामध्ये होते. त्या अनुषंगाने सर्व ग्रामस्थांनी कोरडा दिवस पाळावा असे आवाहन वैदेही वाढाण, अध्यक्ष जि.प. पालघर,
ज्ञानेश्वर सांबरे, उपाध्यक्ष तथा सभापती, आरोग्य समिती,
सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच डॉ.दयानंद सूर्यवंशी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

झिका विषाणू सौम्य स्वरूपाचा आजार असला तरी याचा प्रसार धोकादायक आहे. गरोदर मातांना याची लागण झाल्यास तिच्या बाळाला जन्मजात व्यंग असण्याची शक्यता वाढते. डेंग्यू / चिकुनगुनिया प्रमाणेच हाही आजार एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासा मार्फत होतो. हे डास घरातल्या अंतर्गत व घराच्या बाहेर कुंपणातील पाणी साठ्यात तयार होत असल्याने ग्रामस्थांनी
कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे.
७ दिवसांपेक्षा जास्त दिवस पिण्याचे/ वापराचे पाणी साठवणूक न करणे, छोट्या छोट्या जागी (फुटलेल्या बाटल्या, नारळ करवंटी, फुलदाणी, कुंडी, ताडपत्री, टायर) पाणी साचू न देणे ही वैयक्तिक जबाबदारी ओळखून दक्षता घेणे जेणे करून असा कोरडा दिवस पाळल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होईल.
तसेच या दिवशी घरातील पाण्याची भरलेली सर्व भांडी, हांडे रिकामे करुन स्वच्छ करुन पुसून कोरडी करुन घेणे, घराच्या आजुबाजूला असलेली भांडी, नारळाच्या करवंटया, फुलदानी, प्लॉस्टीक बॉटल, टायर, पिंप, मडकी, ताडपत्री यामध्ये पाणी साचू देऊ नये, साचलेले पाणी आढळल्यास ते त्वरीत ओतून देणे,
पिण्याचे पाणी झाकून ठेवणे,
रात्री झोपतांना स्वरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करणे,
खिडक्या व दरवाज्यांना जाळी बसवणे,
नियमित स्वच्छता पाळणे, घाणीतुन आल्यावर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवणे, ताप आल्यास त्वरीत रक्त चाचणी करुन औषधोपचार करुन घेणे या गोष्टी पाळणे अत्यन्त गरजेचे असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *