
‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य’ महोत्सवात जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण यांचे प्रतिपादन
पालघर, दि. २७ : नैसर्गिक आपत्ती आणि वादळ, वारा व पाऊस यासारख्या विपरीत परिस्थितीत जीवाची पर्वा न करता अखंडित विजेसाठी राबणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे. या कर्मचाऱ्यांमुळेच कोणत्याही कारणांमुळे खंडित झालेली वीज तात्काळ पूर्ववत होते, असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य- पॉवर @२०४७’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि राज्यातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व इतर भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राज्य शासनाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार श्रीनिवास वनगा, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती प्रतिभा दरोडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे, उपजिल्हाधिकारी श्री. जाधवर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी, महावितरणच्या कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचे मुख्य महाव्यवस्थापक उत्पल शर्मा यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती वाढाण म्हणाल्या, वीज ही काळाची गरज बनली आहे. देशाची प्रगती आणि परिवर्तनात विजेचा सिंहाचा वाटा आहे. विजेच्या क्षेत्रात झालेल्या भरीव कामांमुळेच पूर्वीच्या समस्या दूर झाल्या आहेत.
जिल्हाधिकारी श्री. बोडके यांनी वीज ही सध्या मूलभूत गरज बनली असून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे घराघरात आणि शेतीत वीज पोहचल्याचे सांगितले. आमदार श्री. पाटील यांनी ऊर्जा बचतीला महत्व देण्यासोबतच जिल्ह्याची सिंचनक्षमता वाढण्यासाठी काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. आमदार श्री. वनगा यांनी सौरऊर्जा व पवनऊर्जा यासारख्या नवीकरणीय पर्यायांच्या अधिक वापरावर भर दिला.
केंद्र आणि राज्य सरकारच्या ऊर्जा क्षेत्रातील विविध योजनांच्या यशस्वितेबाबत ध्वनिचित्रफितीद्वारे माहिती सादर करण्यात आली. याशिवाय नाटिका आणि स्थानिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांनी केले. सूत्रसंचालन उपकार्यकरी अभियंता महेश नागुल यांनी केले. तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. माळी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधीक्षक अभियंता श्रीमती नागावकर, वसई मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण, नोडल अधिकारी ध्रुव आपटे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम केले. जव्हार येथे २९ जुलै रोजी प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या उपक्रमाचा दुसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

