
ऊर्जा महोत्सवात आमदार सुनील भुसारा यांचे प्रतिपादन
पालघर, दि. ३० :. जिल्ह्यात महावितरणने केलेले काम स्तुत्य आहे. तथापि, आजच्या उच्च तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील जनतेच्या महावितरणकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांच्या पुर्ततेसाठी काम करण्याची अपेक्षा आमदार सुनील भुसारा यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जव्हार येथील प्रकल्प अधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य- पॉवर @२०४७’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी आयुशी सिंग, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गुलाब राऊत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. आमदार भुसारा म्हणाले, गेल्या ७० वर्षात तत्कालिन केंद्र व राज्य शासनानी ऊर्जा क्षेत्र सशक्त करण्यासाठी भरीव काम केले आहे. महावितरणच्या अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांनी लोकसेवकाच्या भुमिकेतून जनहितासाठी काम करावे. प्रतिकूल परिस्थितीत काम करतानाही ग्राहकांशी सौजन्याचे वर्तन ठेवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अप्पर जिल्हाधिकारी गुट्टे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात ऊर्जा क्षेत्रात राबवण्यात आलेल्या विविध योजनांच्या यशस्वितेबाबत ध्वनिचित्रफितीद्वारे माहिती सादर करण्यात आली. याशिवाय नाटिका आणि स्थानिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले.