
वसई ( प्रतिनिधी) वसई तालुक्यातील तहसीलदार कचेरी समोरील सिद्धार्थ नगर मधील पुतळ्याचे मागील बाजूस आणि येथील गटारावर सद्या महापालिकेचे कर्मचारी आणि कायद्याचे पालन करणाऱ्या एका वकिलानेच बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू केले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम राबवून हे बांधकाम त्वरित थांबवावे म्हणून थेट आयुक्तांना साकडे घातले आहे. या पूर्वी देखील सोशल मीडियावर या अवैध बांधकाम बद्दल थेट सर्वच ठिकाणी तक्रारी झालेल्या आहेत मात्र अवैध बांधकाम धारक सुट्टीचे दिवस हेरून बांधकाम करीत असल्याचे दिसून येत आहे. हे बांधकाम ज्या ठिकाणी चालू आहे त्याच्या बाजूला सिद्धार्थ नगर मधील गावकीची विहीर आहे या विहिरीचे सांडपाणी ज्या गटारातून जाते त्याच गटारवर हे बांधकाम सुरू आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संरक्षणार्थ बांधलेल्या भिंतीला लागूनच हे बांधकाम उभे केले जात असल्याने या भिंतीला धोका निर्माण झालेला आहे. वास्तविक जे बांधकाम सुरू आहे ते पूर्णपणे गटारावर आहे गटारावर बांधकाम करणे हे एम् एम आर टी ई कायद्यानुसार गुन्हा ठरत आहे तरीही लोकांचे जाणे येण्याच्या रस्त्यावर हे अतिक्रमण होत असताना आणि मनपाकडे तक्रारी झालेल्या असतानाही पालिका गेंड्यांचे कातडे पांघरलेल्या अवस्थेत वावरत आहे. या बांधकाम रोखावे म्हणून भारती जाधव ह्यांनी या पूर्वीचं मनपाकडे अर्ज दिलेला आहे. मनपाने जागेवर येऊन प्रत्येक्षात काम बंद केले असले तरी चोरी छुपे काम अद्याप चालूच आहे. ही बाब लक्षात घेऊन आता ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हे बांधकाम रोखावे म्हणून सह्यांची मोहीम राबवली आहे उद्या प्रत्येक्षात आयुक्तांकडे ह्या बाबत तक्रार देण्यात येणार आहे. हे बांधकाम वेळीच रोखले गेले नाही तर विहिरीचे सांडपाणी रस्त्यावर येऊन रोगराई पसरण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आता.मनपा या अवैध बांधकामावर काय कारवाई करते हे पाहणे औचित्याचे ठरेल.

