पालघर दि. 03 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यामध्ये 4 लाख 80 हजार घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे उदिष्ठ जिल्हा प्रशासनाचे असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. बोडके बोलत होते.

. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, आयुषी सिंह, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) संजीव जाधवर, जिल्हा पुरवठा अधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक संजय बोदाडे आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

. ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये प्रत्येक ग्रामस्थांच्या घरावर तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहे. महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व नगरपालिकाअंतर्गत येणाऱ्या घरावर तिरंगा ध्वज लावण्याची जबाबदारी त्या त्या कार्यालय प्रमुखावर असेल तसेच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी समन्वय ठेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व घरावर तिरंगा ध्वज लावण्यासाठी नियोजन करुन तिरंगा ध्वज लागला आहे याची खात्री करावी असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. बोडके यांनी दिले.
. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या सर्व बसेसवर, तिरंगा ध्वजाचे स्टीकर लावण्यात यावे आरोग्य विभागाने सर्व रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्र, तसेच कर्मचारी वसाहतीवरती तिरंगा ध्वज लावावा. सर्व कार्यालय प्रमुखांनी रितसर परवानगी घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात ड्रोनव्दारे चित्रिकरण करावे असेहि निर्देश जिल्हाधिकारी गोंविद बोडके यांनी दिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *