
जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचे नागरिकांना आवाहन
जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी दानशूर व्यक्ती,
उद्योजकांनी या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घ्यावा
पालघर दि. 04 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा लावण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व समाजघटकांनी देखील या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशामध्ये उत्साहाने साजरा होणार. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) संजीव जाधवर यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. बोडके बोलत होते.
दानशुर व्यक्ती, उद्योजक यांनी सामाजिक उत्तरदायीत्वाच्या माध्यमातून तिरंगा ध्वज खरेदी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले. घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतस्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये जागृती येऊन ते या मोहीमेत उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवतील असा विश्वास जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी जिल्ह्याला 6 लाख 50 हजार तिरंगा ध्वजाची आवश्यकता आहे. सध्या 2 लाख 50 हजार तिरंगा ध्वज प्राप्त झाले आहेत व उर्वरीत तिरंगा ध्वज लवकरच प्राप्त होतील तिरंगा ध्वजाची विक्री करण्यासाठी नगरपरीषद क्षेत्रात प्रत्येक वार्डामध्ये विक्री केंद्र उभारले जाणार आहेत. तसेच ग्रामिण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ध्वज विक्रीकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे. तिरंगा ध्वजाची विक्री किंमत 21 रुपये असून जास्तीत जास्त नागरीकांनी ध्वज खरेदी करावा असे आवाहनही जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.
ज्या व्यक्तींना ध्वज खरेदी करणे शक्य होणार नाही अशा व्यक्तींसाठी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी हे देणगी स्वरुपात मदत करत आहेत. प्रशासनाकडे देणगी स्वरुपात आतापर्यंत 25 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पुढील काही दिवसात या रक्कमेमध्ये निश्चित वाढ होईल असा विश्वासही जिल्हाधिकारी गोंविद बोडके यांनी व्यक्त केला.
जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी घरोघरी तिरंगा जनजागृती उपक्रमाअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत सांगितले की, 14 ऑगस्ट रोजी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांसाठी 10 किलोमीटर दौड आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्थानकातील अधिकारी व कर्मचारी मागील 1 महिन्यापासून सदर दौड यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सराव करत आहेत. तसेच पोलीस वसाहतीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी सांगितले की, घरोघरी तिरंगा या उपक्रमांची जनजागृती करण्यासाठी शाळा, महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागात घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत जनजागृती करण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा या उपक्रमध्ये ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे आपला सहभागा नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी केला आहे.
घरोघरी तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाजघटकांनी एकत्रित येऊन
उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा