
पालघर दि.12 : हुतात्मा रामचंद्र चुरी यांच्या तैलचित्राचे अनावरण जिल्हाधिकारी गोंविद बोडके यांच्या हस्ते तहसिल कार्यालया जवळील हुतात्मा स्तंभ येथे करण्यात आले.
यावेळी खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, पालघर नगरपरिषेच्या नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे, प्रांत अधिकारी तानाजी तुळसकर तहसिलदार सुनिल शिंदे यांनी हुतात्मा रामचंद्र चुरी यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
14 ऑगस्ट 1942 रोजी चलेजाव आंदोलनादरम्यान पालघरमध्ये काढलेला मोर्चामध्ये गोळीबारात पाच तरुण देशासाठी हुतात्म झाले होते त्यामध्ये मुरबे येथिल हुतात्मा रामचंद्र चुरी यांचा समावेश होता.
यावेळी हुतात्मा रामचंद्र चुरी यांच्या तैलचित्राच्या अनावरण प्रसंगी तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
विभाजन विभीषिका स्मृती दिवसानिमित्त विभाजन काळातील दुर्मिळ छायाचित्रासह माहितीचे प्रदर्शन पालघर तहसिलदार कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाची फीत कापून जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.




