
वसई, दि.16( प्रतिनिधी )
वसई तालुक्याच्या पश्चिमेकडील कळंब ते अर्नाळा पर्यंतच्या अर्धशहरी पट्ट्यातील, तसेच अन्यही बाहेरून येणाऱ्या सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना सत्पाळा येथे विविध उच्चशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारे उत्तर वसईतील ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय कौतुकास्पद कामगिरी बजावत असून, अलीकडील काही वर्षात या महाविद्यालयाने 90 टक्केहुन अधिक निकाल देण्याचे सातत्य ठेवतानाच, मुंबई विद्यापीठाकडून दोन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे, असे गौरवोदगार कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष, तथा वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी काढले.
सोमवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी ज्ञानदीप मंडळ, संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा (विरार पश्चिम) येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राष्ट्रप्रेमाने भारलेल्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी सत्पाळा नाक्यावरून ते कॉलेजपर्यंत मान्यवरांच्या सहभागाने विद्यार्थ्यांची राष्ट्रभक्तीच्या घोषणा देत भव्य रॅली काढण्यात आली.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलतांना रोकडे पुढे म्हणाले, "आपले आदर्श उच्च असायला हवेत, त्यासाठी वृत्तपत्रे आणि ग्रंथाशी मैत्री करायला हवी. थोरामोठ्यांचे विचार आणि त्यांच्या आत्मचरित्राचे वाचन करायला हवे. मोबाईल आणि समाजमाध्यमात अधिक अडकून न पडता, सभोतालच्या अभ्यासातून विविध प्रकारचे ज्ञान आत्मसात करायला हवे. मानवासाठी सृष्टीतील महत्वाच्या मानल्या गेलेल्या जल, अग्नी, वारा, जमीन व आकाश या पंचमहाभूतांप्रमाणेच तुम्हा विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण विकास आणि स्वतःचा उत्कर्ष साधाण्यासाठी मेहनत, चिकाटी, धैर्य, साहस आणि संयम या पंचतत्वाना आपल्या आयुष्यात अंगीकरण्याची नितांत गरज आहे."
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश डोंगरे आपल्या संस्कारक्षम भाषणात म्हणाले, "प्रत्येक विद्यार्थ्याने भारतमातेचा आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या कौशल्याचा आणि कार्यक्षमतेचा पूर्ण वापर करायला हवा. स्वतःतील कल आणि क्षमता ओळखून भविष्याचा मार्ग निवडावा. कला, पत्रकारिता आणि राजकारण या क्षेत्रातही चांगले काम करता येऊ शकते."
अध्यक्षीय भाषणात ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस तुस्कानो म्हणाले,"ज्या भारतमातेने आपल्याला भरभरून प्रेम दिले आहे त्या मातेचे आपण पांग फेडले पाहिजेत. सर्वधर्मस्नेहभाव, समता आणि बंधुत्व ही शाश्वत मूल्ये पाळून आपण भारतमातेचा उत्कर्ष साधायला हवा. महाविद्यालयात लवकरच बीएससी आयटी आणि बीएमएम (मास मीडिया ) या विषयांचे शिक्षण सुरु करण्यात येणार असून, पुढील काळात
इंग्लिश लिट्रेचर, सायकॉलॉजी व पॉलिटिकल सायन्स या विषयांचाही अंतर्भाव करण्यात येणार असल्याचे” तुस्कानो म्हणाले.
प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद डाबरे यांनी केले.
या प्रसंगी वसई पंचायत समितीचे माजी सभापती डॉमिनिक रुमाव यांनी देखील आपले बहुमोल विचार मांडले. सत्पाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच उमेश पाटील, कॉग्रेसच्या पर्यावरण सेलचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक, कृषी पारितोषिक विजेते सुभाष भट्टे , ज्ञानदीप मंडळाचे उपाध्यक्ष टोनी डाबरे, प्रमुख विश्वस्त विन्सेंट डिमोंटि, विश्र्वस्त ॲलेक्स तुस्कानो, एस.के.लोपीस, व्हिक्टर फर्गोस, वलेरियन मच्याडो, पत्रकार चंद्रकांत भोईर, वसई कोमसापचे कार्यवाह संतोषकुमार गायकवाड, उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोझा, कार्यालयीन अधीक्षक विल्यम रॉड्रिग्ज हे मान्यवर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रवाही सूत्रसंचालन प्रा. डॉ. वंदना तुस्कानो आणि प्रा. सबिना मच्याडो यांनी केले. तर प्रा.लविना डिक्रूझ यांनी अतिशय समर्पक शब्दांत उपस्थितांचे आभार मानले.
सत्पाळा ग्रामपंचायततर्फे रोपटी देवून यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. भारताच्या वतीने महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सुरज गुप्ता याने रशिया येथे जाऊन समुह लोकनृत्य सादर केले,या विशेष प्राविण्या बद्दल सुवर्ण पदक देऊन सुरजचा यावेळी सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केले.


