वसई .( प्रतिनिधी ) दिनांक 16- 8 – 2022 रोजी जोरदार पावसामुळे वसई विरार येथे बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेले होते . विरार बोळीज येथील कृष्णा मथुरा नगर या ठिकाणच्या सोसायटीत राहणारी कुमारी तनिष्का लक्ष्मण कांबळे ही १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनी आपला दहावीच्या क्लास संपून संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घरी परत जात असताना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत होती या पाण्यात एक जिवंत वीज वाहिनी तुटून पडली होती. त्या पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे तिला विजेचा जोरदार झटका बसून ती जागीच मृत झाली.
सदरचे घटनेचे वृत्त कळताच काँग्रेसचे नेते तथा माजी वसई विरार युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप दिनेश वर्तक यांनी महावितरणाच्या अधीक्षक अभियंतांना व अतिरिक्त कार्यकारी अभियंता विरार तात्काळ फोन करून दिनांक १७ -०८- २०२२ रोजी पत्र देऊन मृत युवतीच्या वारसांना तत्काळ मदत म्हणून 20000 रुपये देण्याबाबत आणि महावितरणाच्या हलगर्जीपणा मुळे जीव गमवावा लागल्याने तिच्या पालकांना (कुटुंबीयांना) चार लाख रकमेची नियमानुसार नुकसान भरपाई देण्याबाबत कळविले. सदर पत्राची दखल घेऊन महावितरण कंपनीकडून तत्काळ मदत स्वरूपात 20 हजार रुपये आज रोजी देण्यात येणार आहे असे अधीक्षक अभियंता यांनी फोन द्वारे वर्तक यांना कळवले व नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम सर्व कागदत्र व इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्यानंतर देण्यात येईल असे समजले.
आपल्या उमलत्या मुलीच्या अचानक जाण्याने आई-वडिलांवर व त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
देशाचा स्वतंत्राच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सर्वत्र आनंदी वातावरण असताना ही दुर्घटना घडल्यामुळे विरार बोळीज कृष्णा मथुरा नगर परिसरात शोककळा पसरली आहे. सदरच्या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी ही मागणी या पत्रात काँग्रेसचे नेते कुलदीप वर्तक यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *