
प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ए हद्दीत अवैध कब्जा करून केलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करून बांधकामे करणाऱ्यावर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जागा मालकाकडून करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ए हद्दीतील रहिवासी मनोज लुईस लोपिस यांच्या गाव मौजे बोलिन्ज सर्वे नंबर २८८/७ या मालकी शेत जमिनीमध्ये अंतोन जॉन लुद्रिक व बावतीस जॉन लुद्रिक यांनी अनधिकृत बांधकाम केले असून सदर बांधकामावर कारवाई करण्याकरिता मनोज लुईस लोपिस यांनी महानगरपालिकेकडे तक्रार दिल्यानंतर महानगरपालिका प्रभाग समिती ए कार्यालयाने निष्कासन कारवाई केली. मात्र अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
एकदा बांधकाम निष्कासित केल्यानंतर बांधकामधारकांनी पुन्हा बांधकाम उभे केले आहे. पुन्हा बांधण्यात आलेले सदरचे अनधिकृत बांधकाम पुन्हा निष्कासित करून बांधकाम करणाऱ्या अंतोन जॉन लुद्रिक व बावतीस जॉन लुद्रिक यांच्यावर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा तसेच मालकी जागेत घुसखोरी केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज लुईस लोपिस यांनी केली आहे.
वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत बेधडकपणे कोणाच्याही जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असून अधिकारी लाच खाऊन अनधिकृत बांधकामांना संरक्षण देतात. प्रभाग समिती ए कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रकाश जाधव यांच्या विरोधात अनेक तक्रारी असताना गेंड्याची कातडी परिधान केलेल्या या अधिकाऱ्याला आयुक्त अनिल पवार पाठीशी घालण्याचे काम का करीत आहेत?प्रकाश जाधव आयुक्तांना हप्त्यामध्ये अधिक रक्कम देतात का, असा प्रश्न पडल्या वाचून रहात नाही.