
ग्रामस्थांनी दिले सहाय्यक आयुक्तांना निवेदन
नालासोपारा :- हिंदू धर्म शास्त्रानुसार गणेश मूर्तीच्या विसर्जनाचा आग्रह धरणाऱ्या आगरी व कोळी स्थानिकांनी कृत्रिम तलावात गणेश मूर्तींच्या विसर्जनाला विरोध केला आहे. वसई विरार महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी विसर्जन करण्यास स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केला आहे.
महानगरपालिका हद्दीमध्ये जवळपास १४९ छोटे-मोठे तलाव असून यामध्ये दरवर्षी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. सदरच्या बहुतांश मूर्ती पीओपीच्या असल्याने सदर मूर्तींचे तलावात विसर्जन केल्यामुळे तलावातील जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होतो. तसेच सदर गणेश मूर्तीवरील रासायनिक रंगांमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. सबब, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महानगरपालिका मार्फत चालू वर्षी गणेश मूर्ती विसर्जन ठिकाणी कृत्रिम तलावांचे नियोजन करण्यात आले आहे. पण या मनपाच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. आचोळे गावातील स्थानिक आगरी व कोळी लोकांनी गौरी गणपतीच्या विसर्जनाची पिढ्यान पिढ्या चालत असलेली परंपरा मोडीत काढता येणे शक्य नसल्याने स्थानिक गावकऱ्यांच्या मनातील भावनांचा आदर ठेवून आचोळे तलावात विसर्जणासाठी मुभा मिळावी असे निवेदन डी प्रभागच्या सहायक आयुक्त विशाखा मोठघरे यांना शुक्रवारी सकाळी दिले आहे. यापूर्वी जूचंद्र, वालीव या गावातील स्थानिकांनी विरोध दाखवून प्रभारी सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिल्याचे सूत्रांकडून कळते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे नियम दिले आहेत त्याप्रमाणे कुत्रिम तलावात गणेश मूर्त्यांचे विसर्जन करून मनपाच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा ही विनंती. – आशिष पाटील (अतिरिक्त आयुक्त, वसई विरार महानगरपालिका)