नालासोपारा :- वसईत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेली दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोना व टाळेबंदीचे सावट होते. त्यामुळे मूर्तीची उंची, मिरवणुकीतील कार्यकर्त्यांची संख्या असे निर्बंध होते. यंदा मात्र हे संकट बिकट नसल्यामुळे सार्वजनिक मंडळे पूर्वीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करणार आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने सार्वजनिक मंडळांना परवानगी देण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी कोरोनापूर्व काळाप्रमाणेच एक खिडकी कार्यपद्धती सुरू करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस, अग्निशमन दल व विभागातील पोलीस ठाण्याचे ना हरकत प्रमाणपत्र यामुळे एकाच ठिकाणी मिळणार आहे. मात्र गणेशोत्सवात मंडप घालण्यासाठी पालिकेची मंजुरी आवश्यक असते. मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ज्या मंडळांनी या कागदपत्रांची पूर्तता केली त्या मंडळांना रितसर परवानगी देण्यात आली आहे. पण जितक्या मंडपाची परवानगी दिली आहे तेवढाच मंडप घातला पाहिजे असे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वॉच ठेवण्यासाठी प्रशासनाची समिती

गणेश उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था ढासळू नये, नियमांची पायमल्ली होऊ नये तसेच मंडळांना दिलेल्या परवानगी यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासन समिती नेमून वॉच ठेवणार आहे.

रात्री १० पर्यंतच आवाज

गणेश उत्सवात विसर्जन व मिरवणुकीत बरीच मंडळे उशिरापर्यंत सुरू ठेवतात. मात्र १० वाजेपर्यंतच लाऊड स्पिकरला परवानगी असणार आहे. डीजेला यावेळी परवानगी नाकारण्यात आली असून त्यानंतर कोणी डीजे लावल्यास त्या मंडळांवर गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

परवानगी दिलेल्या आकारातच हवा मंडप

सार्वजनिक गणेश मंडळांना उत्सवासाठी वसई विरार महानगरपालिकेने मंडपाची जी परवानगी दिली आहे त्याच आकारातच मंडप असला पाहिजे असे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

तक्रार असल्यास साधा संपर्क

गणेश उत्सव साजरा करताना कुठेही नियमाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित पोलीस ठाणे किंवा समितीकडे संपर्क साधावा.

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची संख्या वाढणार

सतत दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने सण, उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. मात्र यंदा मर्यादा नसल्याने वसई तालुक्यात १५० पेक्षा अधिक गणेश मंडळे वाढणार असून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

कोट

सार्वजनिक गणेशोत्सवांनी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. जेवढी परवानगी तेवढाच मंडप आवश्यक आहे. वेळेची मर्यादा, ध्वनीप्रदुषणाची मर्यादा पाळणे आवश्यक आहे. – प्रशांत वाघुंडे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *