
प्रतिनिधी :
मालजीपाडा येथील अवैध माती भरावासंदर्भात कारवाईस वसई तहसीलदार कार्यालयाकडून टाळाटाळ केली जात असून विकासकाकडून अधिकाऱ्यांनी मोठी तोडपाणी केल्याचे दिसते! सदर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई न केल्याप्रकरणी दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील मालजीपाडा येथील सर्वे नंबर ६५/१,२,३,१०, ६४/१,५, ६५/६, ६९/१/१ या जागेत ५३९० ब्रास अवैध माती भराव केल्या संदर्भात रघु मुदन्ना पुजारी याच्या नावे तहसील कार्यालयाकडून दि. २९/१२/२०२१ रोजी नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र सदर प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे समजते. सदर प्रकरणी झालेल्या कारवाईची माहिती मागितली असता माहिती देण्यात आली नाही. सदर प्रकरणी अपिल दाखल केले असता अपिलीय अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की, सदरची माहिती ही त्रयस्थ व्यक्तींबाबत असल्यामुळे संबंधितांची लेखी संमती घेऊन माहिती अधिकाऱ्यांनी माहिती पुरवावी. त्यानंतरही माहिती न दिल्यामुळे अर्जदार रुबिना मुल्ला यांनी मुख्य माहिती आयुक्त यांच्याकडे द्वितीय अपिल दाखल केले आहे.
माहिती अधिकार अर्जात मागितलेली माहिती देणे बंधनकारक असताना माहिती अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करतात. अपिलात आदेश होऊन ही माहिती दिली जात नाही. कायद्याचे खुल्लमखुल्ला उल्लंघन होत असताना माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. अधिकाऱ्यांना कायद्याचे भय अजिबात राहिलेले दिसत नाही. शासनाने या बाबत आढावा घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पारित करावेत.
माहिती न देणे हा कर्तव्यात केलेला कसूर असून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई होणे आवश्यक आहे.