मुख्यमंत्री रोजगार निर्मीती व पालघर जिल्हा औद्योगिक केंद्र यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार देऊन वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी खासदार राजेंद्र गावित यांचे अथक प्रयत्न, त्याच बरोबर जिल्ह्यातील शेतक-यांकरीता राहुरी पॅटर्न वापरून शेती समृद्धीकडे नेण्यासाठी खासदार राजेंद्र गावितांची वाटचाल….
अल्प भूधारक लहान कृषी शेतक-यांना शेती, पशु पालन , मत्स्यपालन, दुग्ध पालन व्यवसाय करण्याकरिता अजंता ॲग्रो मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीने पालघर जिल्ह्यातील मनोर विभागातील टेन गावात ऑफिसचे उद्घाटन केले. उद्घाटन प्रसंगी खासदार राजेंद्र गावित, खादी ग्रामोद्योग अधिकारी शिशुपाल सिंग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पंजाब राव चव्हाण, कृषी अधिकारी प्रमोद मांगात, मनोर पोलिस निरीक्षक प्रदिप कसबे, सोसायटीचे चेअरमन दिलीप गोवारी, अजंता ॲग्रो सोसायटीचे संचालक अजित घोसाळकर व मॅन्यूअल गोन्सालविस, विरार मनपा वैद्यकिय अधिकारी सचिन पांडे, पालघर जिल्ह्यातील अनेक सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच अनेक शेतकरी बंधु भगिनी मोठ्या संख्याने उपस्थित होते.
खासदार राजेंद्र गावित यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करताना अजंता ॲग्रो मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह सोसायटीला शुभेच्छा देऊन, कृषी कार्यक्रम सादर करताना सोसायटीचे कौतुक केले व त्याचवेळी उपस्थित शेतक-यांना अजंता ॲग्रो सोसायटीच्या कार्यंपद्धतीची सविस्तर माहिती दिली. माती परीक्षण केंद्र, बांबू शेती, मत्स्य पालन, खेकडा शेती, पशुधन, दुग्ध व्यवसाय इ. बद्दल विस्तृत माहिती देताना सोसायटीचे सभासद होण्याचे आवाहन केले.
संचालक अजित घोसाळकर यांनी प्रास्ताविक सादर करताना पालघर जिल्ह्यातील नागरी, सागरी, डोंगरी भागातील शेतक-यांसाठी अजंता ॲग्रो सोसायटी विविध कृषी विकास राबवणार असल्याचे सांगितले. याशिवाय अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पॅटर्न पालघर जिल्ह्यात कसा यशस्वीपणे राबवू शकतो? हे पटवून दिले व त्यासाठी आपण सर्वांचीच मोलाची साथ असणे गरजेचे आहे हे देखिल स्पष्ट केले. खादी ग्रामोद्योग चे अधिकारी शिशुपाल सिंग यांनी केंद्र शासनाच्या विविध कर्ज योजनाची माहिती देत शेतक-यांना प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली. व सोसायटीच्या पुढील वाटचालीत योग्य सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पंजाबराव चव्हाण यांनी सरकारी विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी जास्तीत जास्त शेतक-यांना सोसायटीचे सभासद होण्याचे आवाहन केले. व पशुसंवर्धन विभागाकडून सोसायटीला भविष्यात सर्वतोपरी मदत मिळेल याची खात्री दिली. तसेत चेअरमन दिलीप गोवारी यांनी शेतक-यांना स्वयंपुर्ण होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सर्व शेतक-यांना अजंता ॲग्रो तर्फे किटचे वाटप करण्यात आले. सोसायचीच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचे सुत्र संचालन जतिन कदम व प्रतिभा क्षीरसागर- कदम यांनी केले. तर दिलीप गोवारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.