विरार पूर्वेतील जवळपास ६७ वर्ष जुना व गोर गरीब रुग्णांना जाण्या येण्यासह सर्वच बाबतीत परवडणारा नावाजलेला सरकारी दवाखाना म्हणून ओळख असलेल्या मांडवी दवाखान्याची दिवसेंदिवस दुरावस्था होत चालली असून उघडे छत , सरकलेले वासे व बालांना लोखंडी खांबांचा टेकू दिलेली अवस्था चालू वर्षीही कायम असून या दवाखान्याची ईमारत स्वतः ऑक्सिजनवर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे . मात्र अश्याही धोकादायक परिस्थितीत येथे येत असलेल्या रुग्णांची सेवा करणे येथील कर्मचाऱ्यांना भाग पडत आहे . सलाईनवर दवाखाना हि स्थिती मागील दोन वर्षांपासून असून चालू वर्षी अश्याही स्थितीत रुग्ण सेवा व्हावी म्हणून येथील वैधकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून छतावर ताडपत्री अंथरून व आधाराच्या लोखंडी टेकूम्ची स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे . कारण जून महिना उलटला आहे . त्यामुळे सदर जर्जर इमारतीची दुरुस्ती किंवा डागडुजी होण्याची शक्यताही मावळली आहे . त्यामुळे येत्या पावसाळ्यात कर्मचाऱ्यांसह रुग्णांना अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे वर्तवण्यात येत आहे .
विरार पूर्वेतील महामार्गाच्या हाकेच्या अंतरावरील वज्रेश्वरी रोडवर असलेला हा दवाखाना पोलीस चौकी,आठवडे बाजार भरणाऱ्या मांडवी या मध्यवर्ती ठिकाणी आहे . विरारसह ,वसई फाटा , पेल्हार , कणेर , खार्डी ,वैतरणा , चंदनसार ,खानिवडे,कोपर,शिरसाड ,सकवार,भारोळ ,पाचारुखे , भालिवली ,चिमणे,हेदवडे,चांदीप , शिवणसई व पालघर तालुक्यात असलेले उंबरपाडा,खोन ,दारशेत आदी भागातील नागरिकांना प्रवासाच्या दृष्टीने जवळचा मध्यवर्ती असलेला मांडवीचा १९५३ साली सुरु झालेला जुना सरकारी दवाखाना आहे .त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या हि जास्त असून गरोदर स्त्रियांचे प्रमाण यामध्ये अधिक आहे . सदर दवाखान्याचे बांधकाम हे जुन्या पद्धती च्या बांधकामानुसार जास्त प्रमाणात लाकडी व मंगलोरी कौलांच्या छता चे असून या वास्तूची कालमानाप्रमाणे झीज होत चालली आहे . जुन्या घडणीतील एकमेकात गुंतणारे लाकडाचे वासे व बाल हे सरकू लागले आहेत . दवाखान्यात घुसतानाच दर्शनी भागात सरकलेला बाल पडू नये यासाठी आधाराचे खुंटे म्हणून लोखंडी टेकू लावण्यात आले आहेत .त्याच्याच वर असलेली काही मंगलोरी कौले पडून गेलेली आहेत . तर जेथे रुग्णांना दाखल करून ठेवण्यात येते तेथे तसेच गरोदर मातांची तपासणी व बाळंतपण केले जाते तेथील छताची जून कौले फुटल्याने काही ठिकाणी छत उघडे झाले आहे . त्यामुळे दुरुस्तीविना बाळंतीण विभागात जाताना खाली लावलेल्या कोटा फरशीवर गळणारे पाणी पडून फरशी चिकट व निसरडी होण्याची भीती आहे . यामुळे येथून ये जा करणाऱ्या गरोदर मातांना व कर्मचाऱ्यांना सरकून पडण्याचा मोठा धोका असून अपघात घडण्याची शक्यता आहे . यामुळे सदर दवाखान्याची योग्य डागडुजी होणे आवश्यक आहे . वरील परिस्थितीमुळे एकेकाळी अत्यंत मानाचा दवाखाना असलेल्या मांडवी दवाखान्याची दुरावस्था झाली आहे . वसई तालुक्यात आजच्या घडीला खाजगी दवाखान्याची नुसती फी परवडणारी नाही . त्यात महागड्या औषघंधांचा न परवडणारा खर्च पाहता गोर गरिबांसाठी आधार असलेला हा दवाखाना असल्याची प्रतिक्रिया येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनी सांगितले .
याबाबत १३ जानेवारीला मुंबई तरुण भारत या दैनिकात हे वृत्त प्रसिद्ध होते त्यावेळी जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले होते कि, सदर वास्तूची पाहणी करण्यात आली आहे . याबाबतचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे गेला असून शासकीय प्रक्रिया सुरु आहे . लवकरच मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होईल . मंजुरीनंतर लगेचच दुरुस्ती कामाची सुरवात करण्यात येणार आहे . मात्र आजही स्थिती जैसे थेच आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *