
या काळ्या इंग्रजांना रोखणे गरजेचे : महिलांचा आक्रोश
पालघर, प्रतिनिधी :
भूमिपुत्रांच्या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी होत असलेल्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत पुढील चार महिन्यांत भूमीपुत्रांच्या विविध प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तो न्याय न दिल्यास २६ जानेवारी रोजी आगरी सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी दिला आहे. आगरी सेनेच्या शिष्टमंडळाने कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची भेट घेतली. याप्रसंगी अन्यायग्रस्त शेतकरीदेखील उपस्थित होते.
सरकारी प्रकल्पांना विरोध नाही पण भूमीपुत्रांना योग्य मोबदला आणि विकास झालाच पाहिजे – कैलास पाटील
मुंबई-अहमदाबाद महामार्ग रुंदीकरण, बुलेट ट्रेन प्रकल्प, रेलवे रुंदीकरण प्रकल्प आदी प्रकल्पांना आमचा केव्हाही विरोध नव्हता मात्र भूमीपुत्रावर अन्याय करून विकासाच्या गोंडस नावाखाली त्यांची आर्थिक फसवणूक करणार असाल तर मात्र आगरी सेना गप्प बसणार नाही, असा सज्जड दमच यावेळी कैलास पाटील यांनी दिला. या भेटीत आगरी सेनेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या हितास्तव उच्च न्यायालयात दाखल केलेल्या विविध जनहित याचिकांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी आगरी सेनेचे पालघर प्रवक्ते जयेश पाटील यांनी या भेटीबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, माणिक गुरसळ जिल्हाधिकारी असल्यापासून शेतकरी व भूमीपुत्रांच्या विविध प्रश्नांबाबत त्यांना निवेदन देण्यात आली होती. मात्र त्यांची बदली झाली आणि गोविंद बोडके यांच्याकडे पदभार आला. साधारण महिन्याभरापूर्वी आम्ही बोडकेजींनाही आमच्या मागण्यांचे निवेदन दिलेले आहे. या निवेदनाबाबत पुन्हा स्मरणपत्र देण्यासाठी आज आम्ही येथे आलो होतो. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे चार महिन्यांचा कालावधी मागितलेला आहे. आता चार महिन्यांमध्ये काय होते ते पाहूया नाहीतर आमचा पुढील आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे.
याप्रसंगी आगरी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कैलास पाटील, जिल्हाध्यक्ष चेतन गावड, मोहन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय घरत, जिल्हा सचिव प्रशांत पाटील, प्रवक्ते जयेश पाटील आणि आगरी सेनेचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या काळ्या इंग्रजांना रोखा
आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचताना एका ज्येष्ठ महिलेने सांगितले की, आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती जराही बदललेली नाही. अगोदर गोरे इंग्रज त्रास द्यायचे आणि आता हे काळे इंग्रज आमच्या जीवावर उठले आहेत. मात्र हे काळे इंग्रज समाजासाठी व भूमीपुत्रासाठी खूपच घातकी आहेत. सुरक्षा स्मार्ट सिटी या बांधकाम कंपनीने गुंडांमार्फत केलेल्या दडपशाहीबाबतही त्यांनी आक्रोश व्यक्त केला. सुरक्षा स्मार्ट सिटीच्या गुंडांनी थोडी-थोडी करून आपली जागा कशी हडपली व राहत्या घराचे कंपाऊंड तोडून त्या ठिकाणी टोलेजंग टॉवरचे बांधकाम करून आपल्या हक्कांवर कशी गदा आणली याबाबत वर्णन केले. आपल्याकडे आता गमावण्यासारखे काहीच उरलेले नाही. त्यामुळे जर का आमच्याबरोबर न्याय झाला नाही तर आत्मदहनाशिवाय दूसरा कोणताही पर्याय आपल्याकडे नसल्याचेही या ज्येष्ठ महिलेने यावेळी सांगितले. त्याचबरोबर इतर महिलांनीही आपल्याबरोबर कशी फसवणूक झाली याबाबतचा पुरता लेखाजोखाच सादर केला.
आगरी सेनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे
१. पालघर तालुक्यातील पंचम कोळंबी प्रकल्पाला सरकारने दिलेली मुदत संपलेली असून सदर प्रकल्पाची तीन हजार एकर जागा स्थानिक महिला बचत गटांना देण्यात यावी, जेणेकरून स्थानिकांना मुबलक रोजगार उपलब्ध होईल.
२. सुरक्षा स्मार्ट सिटी या बांधकाम विकासकाने राजावली टीवरी येथील ५३ एकर गुरचरण जागेवर नैसर्गिक नाल्यांची दिशा बदलून तसेच तिवरांच्या झाडांची केलेली बेसुमार कत्तल करून त्यावर केलेल्या अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई करावी व गुरचरण जागेची मोजणी करून ती तात्काळ ताब्यात घ्यावी.
३. कोकण आयुक्तांच्या निर्देशानुसार विरार स्थित शापुरजी पालोनजी कंपनीच्या बांधकाम प्रकल्पासंदर्भातील अहवाल तात्काळ सादर करावा व त्यांना दिलेल्या अकृषिक परवानग्या रद्द कराव्यात.
४. शिक्षण महर्षी पद्मश्री भाऊसाहेब वर्तक १९९८ साली मयत झालेले असतानाही त्यांची बनावट सही व अंगठे मारून त्यांच्या नावाचे बनावट कुलमुखत्यारपत्र २००४ साली नोंदणीकृत करून ३२५ एकर जागेवर उभारलेल्या ग्लोबल सिटीची अकृषिक परवानगी तत्काळ रद्द करावी.