
कणेर ते कोशिंबे गावाच्या काँक्रीट रस्त्याचे काम सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश
विरार, प्रतिनिधी:
आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असलो तरी आजही अनेक गावे मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. विरारजवळील कणेर ते कोशिंबे गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना मरणयातना भोगाव्या लागत होत्या. खराब रस्त्यामुळे येथे अनेक स्रियांचे गर्भपातदेखील झाले तर कित्येक रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दगावले. शाळकरी मुलांनाही ऐन पावसाळ्यात या खड्डेमय रस्त्यांवरून मार्गक्रमण करत शाळेत जावे लागत होते.
अडीचशे – तीनशे घरे असलेल्या या गावाला मुलभूत सेवा पुरवण्याकडे येथील प्रस्थापित राजकारण्यांनी केव्हाही लक्ष दिले नाही. त्यामुळे हताश झालेल्या गावातील काही नागरिकांनी आगरी सेनेकडे आपले गाऱ्हाणे मांडले. यावर आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांचे या समस्येकडे लक्ष वेधले असता आयुक्तांनी ही बाब गंभीरतेने घेत त्वरीत या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. अखेर स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटल्यानंतर आगरी सेनेच्या पाठपुराव्यामुळे गावकऱ्यांना पक्का रस्ता मिळणार असल्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण आहे.
आगरी सेनेचा यशस्वी पाठपुरावा
कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगरी सेनेच्या शिष्टमंडळाने गावातील स्थानिक नागरिकांसह आयुक्तांची याबाबत भेट घेतली असता आयुक्तांनी त्वरीत महापालिकेचे मुख्य अभियंत राजेंद्र लाड यांना रस्त्याचे मोजमाप करून निविदा काढण्याचे आदेश दिले.
आयुक्तांच्या आदेशावरून रस्त्याचे मोजमाप करण्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच रस्त्याची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती पालिका सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे. आगरी सेनेच्या यशस्वी पाठपुराव्यामुळेच आम्हाला पक्का रस्ता मिळणार असल्याची भावना येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.