
२६/०९/२०२२ते ०५/१०/२०२२ या कालावधीत नवरात्री उत्सवाच्यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व विभागांच्या मदतीने “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येणार असून १८ वर्षांवरील सर्व महिला, माता व गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
या अनुषंगाने दिनांक २१/०९/२०२२ रोजी माननीय पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नियोजन समिती सभा घेण्यात आली. या सभेस जिल्हास्तरीय आरोग्य विभाग तसेच इतर विभाग प्रमुख, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक या व्यतिरिक्त जिल्ह्यातील Radiologist संघटना, स्त्रीरोग तज्ञ संघटना ( FOGSI) तसेच बालरोग तज्ञ संघटना( IAP) यांचे प्रतिनिधी सभेस उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ व radiologist यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी उपस्थित संघटना प्रतिनिधी यांना केले.
गर्भधारणापूर्व आरोग्य सेवा, स्त्रीरोग निदान व उपचार, समुपदेशन, मधुमेह/रक्तदाब/कर्करोग पडताळणी व उपचार, क्षयरोग तसेच इतर संसर्गजन्य आजार तपासणी व उपचार या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १८ वर्ष वरील जास्तीत जास्त महिलांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी आरोग्य विभागास केल्या. यात शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, आदिवासी विकास विभाग यांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले.
सदर अभियान काळात जास्तीत जास्त महिलांनी तपासणी करून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय बोदाडे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.सागर पाटील वसई विरार महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.