
भ्रष्ट अधिकार्यांविरोधात कॉंग्रेसने दिला आंदोलनाचा इशारा
नालासोपारा :- विरार महामार्गाजवळील खैरपाडा येथील सर्वे नंबर ७० ही आदिवासी कुळ असलेली जागा खाजगी व्यक्ती आणि त्यानंतर विकासकाच्या ताब्यात गेल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला असून, या भ्रष्ट कारभारात सामील असलेल्या अधिकार्यांविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसने जिल्हाधिकार्यांकडे व्यक्त केला आहे.
वसईतील भ्रष्ट अधिकार्यांच्या संगनमातने सदर जागा हृदय कन्स्ट्रशन यांच्या नावे करण्यात आली असून, त्याला अकृषी परवाना देण्यात आल्याचे उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर या जागेत जाण्यासाठी वन विभागाने सदर विकासकाला रस्ताही करुन दिला आहे. हा भ्रष्ट कारभार वन विभाग मांडवी यांच्या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर झाला आहे. त्यामुळे ज्यांनी सरकारी व वन विभागाच्या जागेचे रक्षण करायचे ते स्वतःच बिल्डर व समाज विघातक लोकांसमोर काही पैशासाठी लोटांगण घालत असल्याची तक्रार कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष समीर वर्तक यांनी महसुल आणि वनमंत्र्यांकडे केली आहे.
आदिवासी कुळ असलेली सदर जमीन ज्याचा नावे झाली त्या बिगर आदिवासी व्यक्तीने विकासकाला विकताना खोटी माहिती देवून नोंदणी करताना शासनाचा २५ लाखांपेक्षा जास्त महसूल बुडविल्याचे समीर वर्तक यांनी उघड केले आहे. या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या महसुल, वनविभाग आणि उपनिबंधक कार्यालयातील भ्रष्ट अधिकार्यांवर कारवाई करुन याप्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी करतानाच कारवाई न झाल्या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समीर वर्तक यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकार्यांची भेट घेवून दिला आहे.
वसई विरारचा पूर्व पट्टा तुंगारेश्वर अभयारण्य असलेल्यांने प्रचंड संवेदनशील आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने येथील पर्यावरण रक्षणाबाबत अनेक आदेश दिले आहेत.या आदेशाचीही पायमल्ली होत असून, कॉंग्रेस पर्यावरण विभाग याबाबत पुढाकार घेवून, दक्ष राहून पर्यावरणाची हानी पोहचविणार्या विरोधात आपला लढा तीव्र करणार असल्याचा इशाराही वर्तक यांनी दिला. यावेळी शिष्टमंडळात सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे, अभिजीत घाग, दर्शन वर्तक, संदीप किणी, पंढरीनाथ पाटील, डेरिक फुट्र्याडो यांचा समावेश होता.
कोट
याबाबत नेमके काय आहे ते बघावे लागेल. तसेच सदर जमिनीच्या सात बाऱ्यावर काय आहे तेही पाहावे लागणार आहे. – सुशांत ठाकरे (मंडळ अधिकारी, मांडवी)