
प्रतिनिधी :
रेल्वे प्रकल्प बाधितांना शासकीय मोबदला मिळणेस जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे वसई ग्रामीण पश्चिमचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत धोंडे यांनी दिला आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. गाव मौजे शिरगाव सर्वे नंबर 294 ही जमीन 7/12 सदरी प्रशांत आर. धोंडे यांच्या नावे असून 4 वर्षांपूर्वी 7/12 वर इतर हक्क सदरी फेरफार क्रमांक 4087 अन्वये वेस्टर्न रेल्वे अशी नोंद घेण्यात आली होती. प्रांत अधिकारी वसई यांच्या आदेशाने सदरची नोंद कमी करण्यात आली. पुनःश्च तालुका उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी 2021 रोजी पत्र देऊन जागेची मोजणी केली. सदर क्षेत्रापैकी 0.01.0 एवढे क्षेत्र संपादित झाले असे कळविले. मोबदला मागितला असता सदरची रक्कम तुळशीराम पाटील यांचे खात्यात नजर चुकीने गेली आहे, असे सांगून आता एक वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. त्यांच्या जागेत मातीचा भराव करून शेतीच्या उत्पन्नापासून वंचित ठेवले आहे. आता मोबदला मागितला असता विवरण पत्र वरिष्ठांकडे पाठविले आहे असे सांगून टाळाटाळ केली जात आहे.
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे वसई ग्रामीण पश्चिमचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत धोंडे यांनी या बाबत जिल्हाधिकारी पालघर यांना पत्र दिले असून न्याय न मिळाल्यास दि. 20/10/2022 पासून उप विभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.