

लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड या त्यांच्या पारंपारीक मतदारसंघात पराभव झाला आणि त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रात केवळ एकच कॉंग्रेसचा खासदार निवडून आला. पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. राज्यात पराभवाच्या गर्तेत लोटलेल्या पक्षाचे नेतृत्व कोणाकडे सोपवायचे हा मोठा यक्ष प्रश्न होता. देशपातळीवर कॉंग्रेसचा पराभव झाला त्याची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर कोण, हा प्रश्न अद्याप कायम आहे. येत्या काही दिवसात त्याचे उत्तर मिळेलही, पण पक्षावर गांधी परिवाराची पकड राहील, असे आजतरी कोणी नाकारत नाही.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, अशा वेळी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षपद रिक्त ठेवणे पक्षाच्या मुळीच हिताचे नव्हते. गेली पाच वर्षे विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पक्षाने ज्यांना संधी दिली, ते राधाकृष्ण विखे-पाटील हे थेट भाजपमध्ये सामील झाले आणि त्यांना मंत्रीपदही मिळाले. पक्षाला आपण दिलेला विरोधी पक्षनेता संभाळता आला नाही, विरोधी पक्ष नेत्याच्या मुलाला पक्षात थोपवता आले नाही. दोन माजी मुख्यमंत्री असणार्या अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेल्या मिलिंद देवरा यांचाही पराभव झाला. पक्षाची एवढी दुर्दशा कधी झाली नव्हती. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे दोन खासदार निवडून आले, यंदा झालेल्या निवडणुकीत केवळ एकच खासदार निवडून आला, तोही ऐनवेळी शिवसेनेतून आलेला उमेदवार होता. विधानसभेतही पक्षाला आपले पन्नास आमदारही निवडून आणता आले नाहीत, अशा पडझड झालेल्या कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे हायकमांडने दिले आहे, यातून बाहेर कसे पडायचे, पक्षाला उर्जा कशी द्यायची, कार्यकर्त्यांना सक्रिय कसे करायचे, पक्षातील गटबाजी कशी रोखायची आणि सर्वात महत्त्वाचे विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर जागा वाटप कसे करायचे, अशी आव्हाने बाळासाहेबांच्या पुढे उभी आहेत.
बाळासाहेब थोरात यांची सार्वजनिक प्रतिमा स्वच्छ आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा नेता आहे. भाऊसाहेब थोरात यांचा वारसा समर्थपणे चालवणारा हा नेता आहे. नगर जिल्ह्यात विखे-पाटील घराण्याशी त्यांची राजकीय शत्रुत्व असले तरी विखे परिवार आता भाजपमध्ये दाखल झाल्याने थोरातांना जिल्ह्यात नवीन चेहर्यांची टीम घेऊन काम करावे लागणार आहे. स्वतः बाळासाहेब थोरात हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. सत्तेसाठी त्यांनी पक्षबदल केला नाही. गेल्या पाच वर्षांत कॉंग्रेसमधून अनेक जण भाजपच्या तंबूत गेले तरी बाळासाहेबांना सत्तेचा मोह पडला नाही. सत्तेपासून सदैव दूर राहिलेल्या कार्यकर्त्यांची बूज राखणारा हा नेता आहे. म्हणूनच त्यांच्याकडून पक्ष कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदावर नेमणूक करताना पक्षाने प्रदेशसाठी पाच कार्याध्यक्ष दिले आहेत. असे प्रथमच घडले आहे. थोरातांची नवी टीम जाहीर करताना पक्षाने महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंग मंत्राचा वापर केला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नुकसान केले. किमान दहा मतदारसंघात तरी वंचित आघाडीने कॉंग्रेसच्या भविष्याला टाळे ठोकले. अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये तर सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूरमध्ये वंचित आघाडीनेच खासदार होण्यापासून रोखले. वंचित-उपेक्षित समाजाच्या मतदाराला दुर्लक्षित करून निवडणूक लढवता येणार नाही, हा संदेश वंचित आघाडीने लोकसभा निवडणुकीत दिला. टीम थोरात जाहीर करताना मराठा, दलित, ओबीसी व मुस्लिम यांना प्रतिनिधीत्व मिळेल याची दक्षता कॉंग्रेस हायकमांडने घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने जे नुकसान केले, त्याची भरपाई कशी करता येईल, या विचारातून पाच नवे कार्याध्यक्ष नेमले आहेत. स्वतः बाळासाहेब थोरात हे मराठा आहेत, त्यांचे सहकार क्षेत्रात उत्तम काम आहे. नगर जिल्ह्यात त्यांनी सहकाराच्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले आहे. 1985 पासून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून येत असून कृषी, जल संसाधन, महसूल, शिक्षण अशा खात्याचे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून ठसा उमटवला आहे. उत्तम संघटक व निष्ठावान असूनही ते प्रसिध्दीच्या झगमगाटापासून नेहमीच दूर राहिले. कॉंग्रेस पक्षातही वरिष्ठांच्या ते पुढे पुढे करताना कधी दिसले नाहीत व तसा त्यांचा स्वभावही नाही.
नीतिन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजित कदम, बसवराज पाटील आणि मुजफ्फर हुसेन यांची पक्षाने प्रदेश कॉंग्रेसवर कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. नीतिन राऊत हा पक्षाचा विदर्भातील दलित चेहरा आहे. विदर्भातील दलितांनी नेहमीच कॉंग्रेसला साथ दिली, पण गेल्या काही वर्षांपासून हा मतदार भाजपकडे व यंदा मोठ्याप्रमाणावर वंचित आघाडीकडे वळाला. यशोमती ठाकूर यांचे गांधी परिवाराशी निकटचे संबंध आहेत. पक्षाचा महिला व ओबीसी चेहरा म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. विदर्भात विधानसभेचे साठ मतदारसंघ आहेत. राऊत व यशोमती ठाकूर यांच्या नियुक्तीने पक्षाला काहीसे अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकेल. बसवराज पाटील हे पक्षाचे व लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. सोलापूर, लातूर भागात लिंगायत मतदारांची संख्या मोठी आहे. बसवराज यांचा समाजात जनसंपर्क मोठा आहे.
विश्वजित कदम हे मराठा व पश्चिम महाराष्ट्रातील युवा नेते आहेत. त्यांचे वडिल पतंगराव कदम यांचा वारसा ते चालवत आहेत. भारती विद्यापाठाचे शिक्षण साम्राज्य मोठे असून त्याची सर्व धुरा विश्वजित संभाळत आहेत. मुजफ्फर हुसेन हे मुस्लिम समाजातील सभ्य व सुसंस्कृत व्यक्तीमत्व आहे. शिक्षण व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम वाखाणण्यासारखे आहे. वंचित आघाडीतील एमआयएमला टक्कर देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा पक्षाला उपयोग होऊ शकतो. येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. गणपती उत्सवानंतर म्हणजे सप्टेंबरच्या दुसर्या आठवड्यात आचार संहिता जारी होऊ शकते. बाळासाहेब थोरात व त्यांच्या टीमला पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी तीन महिने जेमतेम हाती आहेत. प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी मोलाचा आहे. पक्षावर नेमणुका झाल्या म्हणून हार तुरे आणि गुच्छ स्वीकारण्यासही या नवीन टीमला वेळ उरलेला नाही. पराभवाच्या मानसिकतेतून पक्षाला बाहेर काढणे, हे सर्वात मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
वंचित आघाडीबरोबर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा समझोता होणे कठीण आहे. वंचित आघाडीने कॉंग्रेसला चाळीस-पन्नास जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. पराभूत कॉंग्रेसपुढे दोन चार तुकडे फेकावेत, अशी ऑफर वंचितने दिली आहे. अर्थात, कोणी मोठ्या नेत्यांनी अशी भाषा केलेली नाही. त्यामुळे त्याला किती महत्त्व द्यायचे, हे कॉंग्रेस ठरवेल. वंचितची आघाडी जोपर्यंत एमआयएम बरोबर आहे तोपर्यंत कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी वंचित बरोबर जागा वाटप समझोता करेल असे वाटत नाही. पण पुन्हा वंचितने कॉंग्रेस विरोधात आपले उमेदवार उभे केले तर लोकसभा निवडणुकीप्रमाणे नुकसान होण्याचा धोका दिसतो. कॉंग्रेसचा पारंपारीक मतदारच वंचितने आपल्याकडे ओढून घेतला आहे. तो परत कसा आणायचा, हे फार मोठे आव्हान पक्षापुढे आहे. राज ठाकरे यांच्या मनसेबरोबर जागा वाटप करण्यास अशोक चव्हाण फारसे अनुकूल नव्हते. त्यांना बरोबर घेतले तर हिंदी भाषिक मतदार कॉंग्रेसपासून दूर जातील, अशी त्यांना भिती वाटत होती. पण हिंदी भाषिकच नव्हे तर मराठी भाषिकही कॉंग्रेसपासून तिन्ही निवडणुकीत दूर गेल्याचे स्पष्ट झाले. मतदारांमध्ये आता कॉंग्रेस नको अशी मानसिकता तयार झाली असेल तर दूर करणे गरजेचे आहे, त्याखेरीज कॉंग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढणार नाही. राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेतल्यामुळे मनसेसंबंधी कॉंग्रेसच्या दृष्टीकोणात बदल झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातील राज ठाकरे यांची आक्रमक भाषणे व सभांना लोटलेली गर्दी बघता, जागा वाटपात मनसेसाठी कॉंग्रेसचे दरवाजे खुले होतील, अशी चिन्हे आहे.